
ओमायक्रोनच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार उडलेला असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिनच्या प्रिकॉशन डोसमध्ये ओमायक्रोन आणि डेल्टाला निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. सदरची बाब आम्ही केलेल्या चाचण्यांमधून स्पष्ट झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या व्हेरिएंटवर प्रभावीपणे काम करत आहेत. तसेच प्रिकॉशन डोस ओमायक्रोन आणि डेल्टावर भारी पडत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप किंवा अंग दुखत असेल तर त्यावर पॅरासिटॅमोल ही गोळी घेण्याची गरज नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. लहान मुलांच्या काही लसीकरण केंद्रांवर लस घेतल्यानंतर मुलांना पॅरासिटॅमोल किंवा पेनकिलर गोळी घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे लक्षात आल्याने कंपनीने आपली भूमिका मांडली आहे. तसेच आम्ही 30 हजार लोकांवर या लसीच्या चाचण्या केल्या आहेत. यामध्ये 10-20 टक्के लोकांनाच साईड इफेक्ट जाणवला आहे. अनेकांमध्ये ही सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवत असून दोन-तीन दिवसांत ती निघून जातात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही.