कोरोनाची `सेलिब्रिटी’ लाट! अमिताभ, अभिषेक नानावटीत; ऐश्वर्या, आराध्या घरात

बॉलीवूडमधील अनेक बड्या कलाकारांच्या घरात शिरकाव केलेल्या कोरोनाची आता ‘सेलिब्रिटी’ लाटच आली आहे. बिग-बी अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक यांना लागण झाल्याने विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल केले असून सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्या यांना मात्र घरातच क्वॉरंटाइन केले आहे. या चौघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.

बिग-बी आणि अभिषेक यांनीच स्वत:ला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विटरवरून जाहीर केले होते. अमिताभ यांच्या कुटुंबीयांच्या रविवारी आलेल्या कोरोना चाचणी रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय-बच्चन आणि 8 वर्षीय आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर पत्नी अभिनेत्री जया बच्चन (72), मुलगी श्वेता नंदा आणि अगस्त्या नंदा, नव्या, नवेली नातवंडे निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, बच्चन कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील ट्विट केले होते. तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीदेखील बच्चन कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले.

ऐश्वर्याला लक्षणे नाहीत

अभिषेक यांनी केलेल्या ट्विटनुसार अमिताभ, अभिषेक यांना अत्यंत सौम्य लक्षणे होती. मात्र ऐश्वर्या यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पालिकेकडून ऐश्वर्या राय यांना लक्षणांसंदर्भात माहिती देण्यात आली. मात्र आराध्या आणि आपल्याला अशी कोणतीही लक्षणे नसल्याचे त्यांनी पालिकेला सांगितले.

ऐश्वर्या, आराध्याची दुसरी टेस्ट निगेटिव्ह

ऐश्वर्या, आराध्या आणि जया बच्चन यांची दुसऱ्यांदा केलेली अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र खासगी लॅबमधील रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे दोघांनाही १४ दिवस क्वारंटाइन ठेवण्यात येणार असून पुन्हा टेस्ट करण्यात येईल, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आता अमिताभ आणि अभिषेक यांच्या दुसऱ्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

‘जलसा’, ‘जनक’सह चारही बंगले सील

अमिताभ यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जुहू येथील त्यांचे ‘जलसा’, ‘जनक’, ‘प्रतिक्षा’ आणि ‘वत्सा’ हे चारही बंगले पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. आज सकाळी सुमारे तीन तास बंगल्यासह संपूर्ण परिसराचे सॅनिटायझेशन करण्यात आले. शिवाय सुमारे ३० कर्मचाNयांचे थर्मल स्क्रिनिंग करून चाचणीही करण्यात आली आहे. तसेच निकट संपर्कातील कर्मचाऱ्यांच्या चाचणीसाठी स्वॅब सॅम्पल घेण्यात आले. दरम्यान, अमिताभ हे जर आपल्या कर्मचाऱ्यांना ‘जलसा’ बंगल्यावर क्वारंटाइन करीत असतील तर त्यांना पालिकेकडून आरोग्य सुविधेसह सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

नानावटी रुग्णालय, बच्चन यांच्या बंगल्यांबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ

बिग बी अमिताभ आणि त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना कोरोनामुळे विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नानावटी रुग्णालय आणि अमिताभ यांच्या जलसा आणि प्रतीक्षा या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाहत्यांना ही गोष्ट समजताच शनिवारपासून नानावटी आणि त्यांच्या बंगल्याबाहेर गर्दी होत आहे. `बच्चन पितापुत्रासह नानावटी रुग्णालयात इतर कोरोना रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच रुग्णालयाबाहेर चाहत्यांनी गर्दी करू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे,’ अशी माहिती सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरगावकर यांनी दिली.

अनुपम खेर यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोना

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबीयातील चौघांना कोरोना झाला आहे. खेर यांची आई, भाऊ, पुतणी आणि वहिनीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती खेर यांनी ट्विट करून दिली. या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुपम खेर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या