रत्नागिरीत कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन

631

रत्नागिरी तालुक्यातील उद्यमनगर येथील महिला रूग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले असून पालकमंत्री ॲड.अनिल परब यांच्याहस्ते रविवारी कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. कोविड रुग्णालयात आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून रुग्णालयात आलेले रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जातील, अशा सदिच्छा पालकमंत्री ॲड.परब यांनी व्यक्त केल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात येत आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नव्याने बांधलेल्या महिला रुग्णालयात (उद्यमनगर) 75 बेडची व्यवस्था असणारे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करून रविवारी त्याचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, आमदार राजन साळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक तानाजी काकडे उपस्थित होते. या ठिकाणी 20 बेडची आयसीयूदेखील असेल व 66 रुग्णांसाठी बेडनिहाय ऑक्सीजनची सोय असणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. फिनोलेक्स इंडस्ट्रिजच्या मुकुल माधव फाऊंडेशनने कोविड रूग्णालयाला दहा बेडची मदत केली आहे.

उद्घाटन झालेल्या कोविड रूग्णालयातील एका कक्षाला कै.डॉ.दिलीप मोरे कक्ष असे नाव देण्यात आले आहे. जिल्हा कोविड रूग्णालयात सेवा बजावत असताना बालरोगतज्ज्ञ डॉ.दिलीप मोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान कोविड रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे यासाठी कोविड रूग्णालयातील एका कक्षाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या