कोविड रुग्णांच्या मनोरंजनासाठी स्मार्ट फोन, टीव्ही; नाशिक जिल्हा रुग्णालयात तणावमुक्त उपाय

कुटुंबीय व नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटता येत नसल्याने अधिकच तणावग्रस्त होणाऱ्या कोरोनाबाधितांना आता रूग्णालयात स्मार्टपह्न आणि मनोरंजनासाठी टीव्ही संच उपलब्ध होणार आहेत. यामुळे रूग्णांच्या मनातील कोरोनाची भीती व तणाव कमी होवून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयात ही सुविधा रविवारपासून दिली जाईल, तर ग्रामीण भागातील बारा कोविड सेंटर्समध्येही लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक निखील सैंदाणे यांनी दिली.

नाशिक जिल्हा रुग्णालयात चार मजल्यांवर कोविड सेंटरचे एपूण आठ वॉर्ड आहेत, सध्या येथे 82 पॉझिटिव्ह व अन्य संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना परवानगी नाही. आधीच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तणावाखाली रुग्णांना एकाकी वाटते. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी, तसेच नातेवाईकांनाही रुग्ण पुठे व कशाप्रकारे उपचार घेत आहे हे समजावे यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयासाठी प्रत्येकी आठ स्मार्टफोन व आठ टीव्ही संच मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे सादर केला.

मनोरंजन, जागृतीसाठी टीव्हीची मदत
जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावरील वॉर्डमध्ये टीव्ही संच बसविण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांचे मनोरंजन तर होईलच, त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णालयातून घरी गेल्यानंतर घ्यावयाची काळजी, सुरक्षेच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन व समुपदेशनही केले जाणार आहे.

मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईन
रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी लवकरच खाजगी मानसोपचारतज्ञांच्या मदतीने व्हॉट्स हेल्पलाईनही कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील भीती दूर करण्यास मदत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या