कोरोना लसींची तूर्तास खुल्या बाजारात विक्री नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांची माहिती

देशात तयार झालेल्या कोवॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसींची खुल्या बाजारात विक्री केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलं आहे.  या दोन लसींचा नियंत्रित स्वरुपात वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  त्यामुळे या दोन लसी बाजारात खुल्या विक्रीसाठी तूर्तास उपलब्ध होणार नाही असे भूषण यांनी सांगितले आहे.  राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरण म्हणजेच DGCI जोपर्यंत या लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या लसींच्या विक्रीला मान्यता देत नाही तोपर्यंत या लसींची खुल्या बाजारात विक्री शक्य नाही असे सांगण्यात आले आहे.

या लसीचे प्राधान्य ठरवण्यात आले असून ती प्राथमिकतेने आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाशी मुकाबला करत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांना,  विविध दुर्धर व्याधींनी त्रस्त लोकांना , ज्येष्ठ नागरिकांना द्यायचं निश्चित झालं आहे.  देशभरातील निवडक व्यक्तींना लस देण्याचे काम हे पुढील 7-8 महिने चालण्याची शक्यता आहे.  राजेश भूषण यांनी सांगितले देशातील अथवा विदेशआतील कोरोनावरील लसींच्या बाजारात विक्रीसाठी परवानगी मिळालेली नाहीये.  लस निर्मिती करणाऱ्यांनी प्राथमिकता असलेल्या व्यक्तींना लस टोचल्यानंतर त्याच्या परिणाम-दुष्परिणामांची माहिती देणं अपेक्षित आहे.  ती तपासल्यानंतरच खुल्या बाजारात लसींच्या विक्रीला परवानगी मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू होत असते.   तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती ही या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारी असते.

 

आपली प्रतिक्रिया द्या