“सैन्याचे बंकर्स बनवण्यासाठी शेणाचा वापर करा”

12

सामना ऑनलाईन । चंडीगढ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गायीच्या शेणाचा वापर करून हिंदुस्थानी सैन्याचे बंकर्स तयार करावेत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मंगळवारी चंडीगढ येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. गोमांस हे विषसमान आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
‘जगातील ९० टक्के लोक गाईच्या दूधावर अवलंबून आहेत, म्हणून गाय खऱ्या अर्थानं ‘माणुसकीची माता’ आहे. गाय विषारी गोष्टी आपल्या पोटात सामावून घेते. त्यामुळे अशा पवित्र गायीच्या शेणाचा वापर करून सैन्याचे बंकर्स तयार करता येऊ शकतात. तसेच गोमूत्रामध्ये औषधी शक्ती असल्यामुळे कॅन्सरसारख्या रोगावर उपचार होऊ शकतात’, असं वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केलं.
गोमांस हे विषसमान आहे. कोणताही धर्म गोमांस खाण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे गोमांस खाणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. याआधीही मुस्लिम समाजानं मांस खाणे सोडून द्यावं. मांस खाणे हा एक प्रकारचा आजार असून, दूध हे त्यावरचं औषध आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या सरबतात दूध घालावे, असं आवाहन त्यांनी केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या