कल्याण स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेस घसरली

26

कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प

सामना प्रतिनिधी । ठाणे

कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकल खोळंबा होणे हे मध्य रेल्वेवर नित्याचेच झाले आहे. आज दुपारी चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कल्याण स्थानकानजीक हजरत निजामुद्दीन एरनाकुलम मंगला एक्स्प्रेसचे इंजिन घसरले आणि कल्याण-कसारा मार्गावरील लोकल सेवा दोन तास ठप्प झाली. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार लोकल घसरल्याच्या घटनेने मध्य रेल्वेच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे

मुंबईकडे येणारी मंगला एक्स्प्रेस कल्याण स्थानकाकडे येत होती. कल्याण स्थानकात गाडी येण्यास अवघी दोन मिनिटे असतानाच मोठा आवाज जाला. रेल्वे ट्रक बदलत असताना या एक्स्प्रेसच्या इंजिनाचे चाक रूळावरून घसरले. यामुळे प्रवासी वर्गात एकच गोंधळ उडाला. काहींनी डब्यामधून पटापट प्रवाशांनी उडय़ा मारल्या. सुदैवाने ट्रक बदलत असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेनंतर अर्ध्या तासातच आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली. साडे चार वाजता घसरलेले इंजिन रूळावर आणण्यात यश आले. मात्र रूळांचे मोठे नुकसान झाले आहे.

रोज मरे त्याला…

मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य आणि हलगर्जी कारभारामुळे सीएसटी-कसारा मार्गावरील लाखो प्रवाशांना आठवडय़ातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने लटकंतीला तोंड द्यावे लागत आहे. लोकल सेवेची रखडपट्टी तर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रेल्वेचा सततचा यांत्रिक बिघाड, पेंटाग्राफ तुटणे, सिग्नलमध्ये बिघाड, रूळावरून गाडी घसरणे या कारणाने गाडय़ांना होणारा विलंब यामुळे चाकरमानी कमालीचे पिचून गेले आहेत.

लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबून

इंजिन घसरल्याने कल्याण-कसारा या अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांचे वेळापत्रकदेखील कोलमडले आहे. घसरलेले इंजिन रूळावर आनन्यास विलंब होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून डोंबिवली आणि शहाड या स्थानकांदरम्यान लोकल आणि काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबवून ठेवल्या.

२.२० ते ४.२०… दोन तास

डबे घसरण्याबरोबरच अपघातात रेल्वे रूळ तुटले. ही सर्व दुरुस्ती युद्धपातळीवर रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेने हाती घेतली. यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ या कामासाठी जुंपले होते. अभियांत्रिकी, विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी या सर्व कामावर लक्ष ठेवून होते. या कामासाठी तीन तास गृहीत धरले होते. मात्र नियोजनानुसार काम झाल्याने ४.२० वाजता मध्य रेल्वे पूर्वपदावर आली.

आपली प्रतिक्रिया द्या