वनांची आग रोखण्यासाठी जाळ रेषा निर्मिती करावी – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वनक्षेत्र आणि सातारा जिल्ह्यात असणा-या वनांना सातत्याने आग लागत आहे. तसेच काही व्यक्तिही वनांना आग लावतात. याला प्रतिबंध करण्यासाठी जाळ रेषा निर्मिती करावी. यासाठी लागणारा निधी देण्याची हमी सहकार पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वन विभाग कार्यालय येथे जिल्ह्यातील, वन विभागातील इतर कामांचा आढावा घेण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा करून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत वन विभागास प्राप्त होणारा निधी आणि उपरोक्त सेवा सुविधांसाठी होणारा संभाव्य खर्च तसेच वनविभागाच्या इतर विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

वन्यजीव व त्यांच्या नैसर्गिक अधिवास असणाऱ्या जंगलाचे संरक्षण करण्याची गरज, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याबाबत जनजागृती करणे, उन्हाळ्याच्या दिवसांत प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जंगलामध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करून मानवी वस्तीत पाण्याच्या शोधासाठी वन्य जीवांना येण्यापासून रोखणे तसेच वनांना वारंवार लागणारी आग (वणवे) रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून लोकांमध्ये जनजागृती करण्याबाबत महत्त्वाच्या सुचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

यावेळी सातारा उपवनसंरक्षक डॉ.भारतससिंह हाडा, सहा.वनसंरक्षक व्ही.जे.गोसावी, सहा.वनसंरक्षक एस.बी.चव्हाण, सहा.वनसंरक्षक के.एस.कांबळे, वनवपरिक्षेत्र अधिकारी एस.एन.ढोंबाळे तसेच जिल्ह्यातील इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या