अमेरिकन युवकांनी गिरवले क्रिकेटचे धडे

40

मुंबई, (क्री.प्र.)

हिंदुस्थानला दिग्गज क्रिकेटपटू देणार्‍या शिवाजी पार्क जिमखान्यात (एसपीजी) सोमवारी अमेरिकेतल्या युवा क्रिकेटपटूंनीही या खेळातील बारकावे आत्मसात केले. क्रिकमॅक्स या अमेरिकेतील अ‍ॅकॅडमीचा १४ वर्षांखालील संघ हिंदुस्थान दौर्‍यावर आला असून आगामी काळात तो मुंबईतील विविध क्लबविरुद्ध आठ लढती खेळणार आहे. गेल्या वर्षीही या संघाने मुंबईचा दौरा केला होता. शिवाजी पार्क जिमखान्याच्या संघाने ही लढत अगदी सहज जिंकून आपले वर्चस्व कायम राखले. दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी मुंबापुरीत खेळण्याचा अनुभव मिळवला.

उभय संघांमधील लढत संपल्यानंतर एसपीजीचे अविनाश कामत, सुनील रामचंद्रन यांच्या हस्ते क्रिकमॅक्स अमेरिकेच्या अशोक पटेल अ‍ॅण्ड कंपनीचा सत्कार करण्यात आला. दिनेश नानावटी यांचेही या दौर्‍यासाठी मोठे योगदान ठरले. तसेच पद्माकर शिवलकर, किरण अधिकारी व अरुण वत्स या एसपीजीमधील क्रिकेट प्रशिक्षकांनीही या लढतीसाठी परिश्रम घेतले हे विशेष. अशोक पटेल यांनीही यावेळी एसपीजीचे आभार मानले.

लवकरच एसपीजीचा संघ अमेरिकेत खेळणार – सुनील रामचंद्रन

मागील दोन वर्षे अमेरिकेचा क्रिकेट संघ मुंबईत येऊन क्रिकेटचे बारकावे आत्मसात करीत आहे. येथील खेळपट्ट्या व वातावरणात खेळण्याचा अनुभव तेथील क्रिकेटपटू घेत आहेत. आता आगामी काळात शिवाजी पार्क जिमखान्याचा क्रिकेट संघ अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती एसपीजीचे असिस्टण्ट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन यांनी यावेळी दिली.

क्रिकमॅक्स अमेरिका संघाच्या मुंबईतील लढती खालीलप्रमाणे

१) शिवाजी पार्क जिमखान्याविरुद्ध
२) दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीविरुद्ध
२) दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीविरुद्ध
४) पीजे हिंदू जिमखान्याविरुद्ध
५) चंद्रकांत पंडीत अ‍ॅकॅडमीविरुद्ध
६) एअर इंडियाविरुद्ध
७) एमआयजीविरुद्ध
८) लालचंद राजपूत अ‍ॅकॅडमीविरुद्ध

आपली प्रतिक्रिया द्या