दशकातील सर्वोत्तम वन डे आणि कसोटी संघ जाहीर, दोन्ही संघाचे नेतृत्व टीम इंडियाकडे

1163

नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस बाकी असून सरत्या वर्षासह एका दशकाचाही (2010 ते 2019) शेवट होईल. 2019 हे वर्ष क्रिकेटपटू आणि चाहत्यांसाठी कायमच आठवणीत राहील. कारण जगाला क्रिकेट हा खेळ देणारा इंग्लंडचा संघ पहिल्यांदाच एक दिवसीय विश्वचषक जिंकला, तर हिंदुस्थानने याच वर्षी पिंक बॉलने डे-नाईट कसोटीची सुरुवात केली. यासह हे संपूर्ण दशक क्रिकेटसाठी अविस्मरणीय राहिले, कारण अनेक रोमहर्षक लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दशकातील सर्वोत्तम वन डे आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या दशकभरात केलेल्या कामगिरीच्या आधारावर वन डे आणि कसोटीसाठी सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ निवडला आहे. हिंदुस्थानसाठी गर्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांचे नेतृत्व टीम इंडियाचे खेळाडू करणार आहेत. एक दिवसीय संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे सोपवण्यात आले आहे, तर कसोटी संघाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर आहे.

28 वर्षानंतर हिंदुस्थानला एक दिवसीय विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियाला अनेक सोनेरी क्षण दाखवले. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या दशकात वन डे विश्वचषक, आशिया चषक, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. त्यामुळेच वन डे संघाचे नेतृत्व धोनीकडे देण्यात आले आहे. कर्णधारपदासह यष्टीरक्षणाचीही जबाबदारी धोनीकडे देण्यात आली आहे. धोनीसह विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंची वन डे संघात वर्णी लागली आहे.

विराट, रोहितने गाजवले वर्ष; धावांचा पाऊस पाडत विक्रमांचे इमले उभारले

कसोटी संघाचे नेतृत्व आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. दशकातीस सर्वोत्तम कसोटी संघात तो एकमेव हिंदुस्थानी खेळाडू आहे. हिंदुस्थानसह इंग्लंडच्या चार, ऑस्ट्रेलियाच्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन व न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा या संघात समावेश आहे.

वन डे संघ –
एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रोहित शर्मा, हाशिम आमला, विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स, शाकिब-अल-हसन, जोस बटलर, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, लसिथ मलिंगा आणि राशिद खान

कसोटी संघ –
विराट कोहली (कर्णधार), अलिस्टर कूक, डेव्हीड वॉर्नर, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, एबी डीव्हीलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नाथन लायन आणि जेम्स अँडरसन

आपली प्रतिक्रिया द्या