‘मला गर्लफ्रेंडने शिकवली इंग्रजी’, पत्नीसमोर हरभजन सिंगची कबुली

हरभजन सिंगने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत शानदार गोलंदाजी केली, परंतु एक चांगला गोलंदाज होण्याबरोबरच तो एक अतिशय विनोदी स्वभावाचा व्यक्ती देखील आहे. तो नेहमीच बिनधास्तपणे एखाद्या गोष्टीवर आपले मत व्यक्त करतो. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही त्याने असेच काहीसे केले आहे. हरभजन सिंग त्यांची पत्नी गीता बसरा हिच्यासोबत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आला होता. यावेळी त्याने आपल्या पत्नीसमोर गौप्यस्फोट करत, आपण आपल्या श्रीलंकेतील गर्लफ्रेंडकडून इंग्रजी शिकलो असल्याचे त्याने कबूल केले.

कपिल शर्मा शोमध्ये हरभजन सिंगने या गोष्टीचा खुलासा करत म्हणाला की, ‘माझी इंग्रजी अंडर -19 च्या काळापासूनच खराब होती, तेव्हा जेव्हा मी टूरला जाताना अजित आगरकरसोबत खोली शेअर करायचो. तेव्हा आगरकरने जेवणाची ऑर्डर दिली की मीही त्यांचं ऐकून तेच जेवण ऑर्डर करायचो. आगरकर जेवण ऑर्डर करताना कधी कॅन यु, बोलायचा तर कधी कूड यु बोलायचा, यामुळे मी गोंधळायचो. एकदा आगरकर खोलीत नव्हता तेव्हा मी हॉटेलला फोन केला आणि कॅन यु, कूड यु बोललो. मात्र नक्की काय बोलायचं होत, मी तेच विसरलो.’

हरभजन सिंग पुढे म्हणाला, ‘नंतर माजी मैत्री एका श्रीलंकेतील मुलीशी झाली. तिने मला इंग्रजी शिकण्यास खूप मदत केली. तिला भेटल्यानंतर मी इंग्रजीत गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, फाईन असे शब्द बोलू लागलो.’  हरभजन सिंगने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी इंडियन क्रिकेट टीममध्ये पदार्पण केले. हरभजन सध्या टीम इंडियामधून बाहेर आहे, पण त्याने आपल्या कारकीर्दीत दमदार कामगिरी केली आहे. भज्जीने 417 कसोटीत आणि 269 एकदिशीय सामन्यात विकेट घेतले आहे. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या