एल्गार, डी कॉकची शतकी झुंज; दक्षिण आफ्रिका आता 117 धावांनी पिछाडीवर

267

हिंदुस्थानच्या 502 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना पाहुण्या दक्षिण आफ्रिकेची गुरुवारी पहिल्या डावात 3 बाद 39 अशी दुर्दशा झाली होती. मात्र शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सलामीवीर डीन एल्गार (160) व क्विण्टॉन डी कॉक (111) यांनी झुंजार शतके ठोकून दक्षिण आफ्रिकेला संकटातून बाहेर काढले. मात्र या दोघांना बाद करून ‘टीम इंडिया’ने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुनरागमन करण्यात यश मिळवले. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 118 षटकांत 8 बाद 385 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. सेनुरॅन मुथ्यास्वामी 12, तर केशव महाराज 3 धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात अजूनही 117 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 2 फलंदाज शिल्लक आहेत. अद्यापि दोन दिवसांचा खेळ बाकी असल्याने हिंदुस्थान जिंकण्याच्या, तर दक्षिण आफ्रिका कसोटी अनिर्णित राखण्याच्या इराद्याने खेळणार हे आता स्पष्ट झाले आहे.

डुप्लेसिसची मोलाची साथ

दक्षिण आफ्रिकेने दुसऱया दिवसाच्या 3 बाद 39 धावसंख्येवरून शुक्रवारी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र तेम्बा बवुमाला (18) इशांत शर्माने सकाळच्या सत्रातील सातव्याच षटकांत पायचित करून दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला. त्यानंतर आलेला कर्णधार फाफ डुप्लेसिसने आघाडीवीर डीन एल्गारला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करून डाव सावरला. डुप्लेसिसने 103 चेंडूंतील संयमी खेळीत 55 धावा करताना एका षटकारासह आठ चेंडू सीमापार पाठवले. रविचंद्रन अश्विनने डुप्लेसिसला पुजाराकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पाचवे यश मिळवून दिले.

दीडशतकी भागीदारी

डुप्लेसिस बाद झाल्यानंतर आलेल्या क्विण्टॉन डी कॉकने एल्गारच्या साथीने हिंदुस्थानी गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार केला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी 164 धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला साडेतीनशेचा टप्पा ओलांडून दिला. दीडशतकी खेळी करणाऱया डीन एल्गारला रवींद्र जाडेजाने पुजाराकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. मात्र तोपर्यंत एल्गारने 160 धावांच्या खेळीत 287 चेंडूंचा सामना करताना 4 षटकारांसह 18 चेंडू सीमापार धाडले. त्यानंतर कारकीर्दीतील चौथे कसोटी शतक झळकावणाऱया क्विण्टॉन डी कॉकचा अश्विनने त्रिफळा उडवून दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. डिक्वॉकने 163 चेंडूंना सामोरे जाताना 2 षटकार व 16 चौकारांसह 111 धावांची खेळी केली. त्याच्या जागेवर आलेल्या वेर्नोन फिलॅण्डरला अश्विनने भोपळाही फोडू न देता माघारी पाठवता दक्षिण आफ्रिकेचा आठवा फलंदाज बाद केला. हिंदुस्थानकडून रविचंद्रन अश्विनने 5 फलंदाज बाद केले, तर रवींद्र जाडेजाला 2 व इशांत शर्माला 1 बळी मिळाला.

जाडेजाचा विक्रम

हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डीन एल्गारला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा गाठला. त्याने 44 कसोटींत बळींचे द्विशतक साजरे केले. कमी सामन्यांमध्ये 200 फलंदाज बाद करणारा तो पहिला डावखुरा गोलंदाज बनलाय. याआधी श्रीलंकेच्या रंगना हेराथने 47 कसोटी सामन्यांत 200 बळी टिपले होते. त्याचा विक्रम जाडेजाने शुक्रवारी मोडीत काढला.

संक्षिप्त धावफलक-

हिंदुस्थान पहिला डाव – 7 बाद 502 धावां (घोषित)

दक्षिण आफ्रिका पहिला डाव – डीन एल्गार झे. पुजारा गो. जाडेजा 160, एडन मार्करम त्रि. गो. अश्विन 5, थ्युनिस डी ब्रूयन झे. साहा गो. अश्विन 4, डेन पिडट् त्रि. गो. जाडेजा 0, तेम्बा बावुमा पायचित गो. इशांत 18, फाफ डुप्लेसिस झे. पुजारा गो. अश्विन 55, क्विण्टॉन डी कॉक त्रि. गो. अश्विन 111, सेनुरॅन मुथ्यास्वामी खेळत आहे 12, वेर्नोन फिलॅण्डर त्रि. गो. अश्विन 0, केशव महाराज खेळत आहे 3.

अवांतर – 17, एकूण – 118 षटकांत 8 बाद 385 धावा.

गोलंदाजी – रविचंद्रन अश्विन 41-11-128-5, रवींद्र जाडेजा 37-4-116-2, इशांत शर्मा 14-2-44-1, मोहम्मद शमी 15-3-40-0.

आपली प्रतिक्रिया द्या