‘टीम इंडिया’ला ऐतिहासिक मालिका विजयाची संधी; यजमान न्यूझीलंडसाठी ‘जिंकू किंवा मरू’

गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर सरस कामगिरी करणाऱ्या ‘टीम इंडिया’ला 29 जानेवारीला ऐतिहासिक मालिका विजयाची संधी असेल. कारण न्यूझीलंडविरुद्ध हिंदुस्थानला अद्यापि टी-20 क्रिकेट मालिका जिंकता आलेली नाही. दुसरीकडे लागोपाठच्या दोन पराभवाने पाय खोलात गेलेल्या यजमान न्यूझीलंडची अवस्था ‘जिंकू किंवा मरू’ अशी झाली असून स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी त्यांना आता प्रत्येक लढत जिंकावी लागणार आहे.

न्यूझीलंड दौऱयावर ‘टीम इंडिया’ला दोन वेळा हार पत्करावी लागलेली आहे. 2008-09 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला 0-2 फरकाने, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 1-2 फरकाने टी-20 मालिकेत हार सहन करावी लागली होती. मात्र आता यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर या नव्या दमाच्या फलंदाजांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. सदन पार्कसारख्या छोटय़ा मैदानावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासह युजवेंद्र चहल व रवींद्र जाडेजा या फिरकीच्या जोडगोळीने जबरदस्त कामगिरी करून न्यूझीलंडच्या फलंदाजांमध्ये धडकी भरवली आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे अनुभवी खेळाडू लवकर बाद झाल्यानंतरही हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंनी मिळवून दिलेले विजय नक्कीच सुखावणारे आहेत.

न्यूझीलंडबाबत बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराहची गोलंदाजी कशी खेळायची हे कोडे त्यांना अद्याप सुटलेले नाही. कॉलिन डी ग्रॅण्डहोम दोन्ही डावांत अपयशी ठरल्याने यजमानांच्या फलंदाजीवर दबाव आला. त्यामुळे मालिकेतील आव्हान राखण्यासाठी न्यूझीलंडला नव्या योजनेसह मैदानावर उतरावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या