अर्शदीप, चहरच्या गोलंदाजीचा कहर! हिंदुस्थानचा दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून विजय

हिंदुस्थानने पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट आणि 20 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी पहिल्या स्पेलमध्ये केलेली भन्नाट गोलंदाजी आणि लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांची नाबाद अर्धशतके ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. टीम इंडियाने विजयी सलामीसह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. द. आफ्रिकेचे 3 फलंदाज बाद करणाऱया अर्शदीपला ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची अतिशय वाईट सुरुवात झाली. दीपक चहरने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावुमाचा पहिल्याच षटकात शून्यावर त्रिफळा उडवला. मग अर्शदीप सिंगने दुसऱया षटकात क्विंटन डी कॉक (1), रिली रोसौव (0) व डेव्हिड मिलर (0) यांच्या विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला भगदाड पाडले. डी कॉक व मिलर यांच्या त्याने दांडय़ा गुल केल्या, तर रोसौवला यष्टीमागे पंतकरवी झेलबाद केले. अर्शदीपच्या या भन्नाट गोलंदाजीमुळे पाहुण्यांची अवस्था 2.3 षटकांत 5 बाद 9 अशी केविलवाणी झाली. मात्र त्यानंतर एडेन मार्कर्रम (25), वायने पार्नेल (24) व खाली केशव महाराज (41) यांनी हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला म्हणून दक्षिण आफ्रिकेला धावांची शंभरी ओलांडता आली. हिंदुस्थानकडून अर्शदीपने 3, तर दीपक चहर व हर्षल पटेल यांनी 2-2 विकेट घेतल्या. अक्षर पटेलनेही एक विकेट घेतली. रविचंद्रन अश्विनला एकही विकेट मिळाली नाही, पण त्याने चारपैकी एक षटक निर्धाव टाकून केवळ 8 धावा दिल्या.

राहुल-सुर्यकुमार जोडीची 93 धावांनी नाबाद भागिदारी

दक्षिण आफ्रिकेला 8 बाद 106 धावसंख्येवर रोखल्यानंतर हिंदुस्थानने 16.4 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 110 धावा करीत विजयाला गवसणी घातली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (0) व विराट कोहली (3) हे महारथी फलंदाज झटपट तंबूत परतले, मात्र त्यानंतर लोकेश राहुल (नाबाद 51) व फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव (नाबाद 50) यांनी 93 धावांची अभेद्य भागीदारी करीत हिंदुस्थानला मोठा विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून पॅगिसो रबाडा व एन्रीच नॉर्खिया यांनी 1-1 विकेट घेतली.