कोरोनाचा धसका; तिकीट विक्रीला फटका; रिकाम्या मैदानावर भिडणार हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका

न्यूझीलंड दौऱयावर सपाटून मार खाणारी ‘टीम इंडिया’ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर आपला राग काढण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र जीवघेण्या कोरोना व्हायरसचा क्रिकेटप्रेमींनीही धसका घेतल्याने तिकीट विक्रीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी होणाऱया सलामीच्या एकदिवसीय लढतीत उभय संघांचे रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत होणार आहे. कारण 22 हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या धरमशाला स्टेडियमवरील 40 टक्केही तिकिटे विकली गेली नाहीत. शिवाय तिकिटे घेतलेले सर्व क्रिकेटप्रेमी मैदानावर येतीलच याचीही शाश्वती नसल्याने रिकाम्या मैदानावरच पहिला सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. चार वर्षांनंतर हिंदुस्थान दौऱयावर आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ येथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

क्रिकेटप्रेमींची घेणार विशेष काळजी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धरमशाला स्टेडियम व्यवस्थापन आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन यांनीही सामना बघण्यासाठी येणाऱया क्रिकेटप्रेमींची मैदानाकर विशेष काळजी घेण्याचे ठरकले आहे. ‘विमानतळाकरून येणाऱया प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. स्टेडियममध्ये प्रवेशद्वाराजवळ 10 डॉक्टरांची टीम सज्ज असणार आहे. लेझर थर्मामीटरच्या माध्यमातून प्रत्येकाची चाचणी होणार आहे. ज्यांना ताप आला असेल त्यांची तातडीने तपासणी केली जाईल.

‘बीसीसीआय’चे वैद्यकीय पथक सज्ज

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या लढतीसाठी आपले वैद्यकीय पथक सज्ज केले आहे. क्रिकेट संघाच्या निवासाची व्यवस्था असलेले हॉटेल, विमानसेवा व वैद्यकीय पथक या सर्वांना आपापल्या सेवा पुरविण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितले आहे.

‘बीसीसीआय’च्या टीप्स

  • पाणी व साबणाने विमान 20 सेकंद हात धुवावे.
  • हाताला सॅनिटायझरचा नियमित वापर करावा.
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवावा.
  • कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास लगेच वैद्यकीय पथकाला कळवावे.
  • हात धुतल्याशिवाय तोंड, डोळे, नाक यांना शक्य तो स्पर्श टाळावा.
  • हस्तांदोलन व अनोळखी व्यक्तीबरोबर सेल्फीचा मोह टाळावा.
  • बाहेरचे पदार्थ खाणे शक्य तो टाळावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या