मुंबई-दिल्लीमध्ये चढाओढ, तिसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज

मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील लढत रंगणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन विजय संपादन केले असून एका लढतीत उभय संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याप्रसंगी रोहित शर्माची मुंबई इंडियन्स व रिषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये तिसऱया विजयासाठी चढाओढ लागेल यात शंका नाही. चेन्नईमध्ये रंगणाऱया लढतीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

रोहित, सूर्यकुमार, इशान, हार्दिकने चमकायला हवे

सलग दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल मोसमात तीनपैकी दोन लढतींमध्ये विजय मिळवला खरा, पण या संघातील फलंदाजांना अद्याप प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांडय़ा या स्टार फलंदाजांनी ठसा उमटवायला हवा. मागील लढतीत कायरॉन पोलार्डने अखेरच्या षटकामध्ये केलेल्या दे दणादण फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने विजय साकारला होता. पण यापुढील लढतींमध्ये सर्व फलंदाजांना आपली धमक दाखवावी लागणार आहे. अन्यथा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर होईल.

खेळपट्टी बदलणार…

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लढती खेळलेल्या आहेत. पण उद्याची लढत ही चेन्नईत होणार आहे. त्यामुळे रिषभ पंतच्या संघाला तेथील खेळपट्टीप्रमाणे ‘अॅडजस्ट’ करावे लागणार आहे. मुंबईतील वानखेडेवर धावांचा पाऊस पडतो, तर चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर एक एक धावेसाठी झगडावे लागते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानात उतरताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

धवन, पृथ्वी जबरदस्त फॉर्ममध्ये

दिल्ली कॅपिटल्सकडे शिखर धवन व पृथ्वी शॉ यांच्या रूपात जबरदस्त सलामी फलंदाजी आहे. दोघांनी या स्पर्धेत आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना या दोघांना रोखावे लागणार आहे. तसेच मार्कस स्टोयनीस, रिषभ पंत यांच्या खांद्यावर मधल्या फळीची जबाबदारी आहे. अजिंक्य रहाणे व स्टीवन स्मिथ यांच्यापैकी कोणाला उद्याच्या लढतीत संधी देण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पाचव्या गोलंदाजाची उणीव

मुंबई इंडियन्सने या मोसमात मिळवलेल्या दोन विजयांमध्ये गोलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. जसप्रीत बुमराह व ट्रेण्ट बोल्ट या स्टार व अनुभवी गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. फिरकी गोलंदाज दीपक चहर याने मागील दोन लढतींमध्ये सामना फिरवण्याची करामत करून दाखवलीय. कृणाल पांडय़ाने कामगिरीत सातत्य राखायला हवे. हार्दिक पांडय़ा गोलंदाजी करीत नाही. त्यामुळे पाचव्या गोलंदाजाची कमतरता या संघाला जाणवतेय. माकां यानसेन व अॅडम मिल्न या दोघांना अंतिम अकरांमध्ये स्थान देऊन बघितले आहे. आता उद्या आणखी बदल करण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.

आजची आयपीएल लढत

मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई, रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या