राजस्थानसमोर चेन्नईचे आव्हान, धोनीच्या ब्रिगेडला हवाय सलग दुसरा विजय

सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स संघ मंगळवारी होणाऱया आयपीएलच्या लढतीत राजस्थान रॉयल्सशी दोन हात करील. याप्रसंगी सलग दुसरा विजय मिळवून आपली घोडदौड कायम राखण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स प्रयत्न करताना दिसेल. राजस्थान रॉयल्सचा संघ मात्र विजयाची बोहणी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. यावेळी बेन स्टोक्स, जोस बटलर या स्टार खेळाडूंची अनुपस्थिती राजस्थान रॉयल्सला भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघूया उद्याच्या लढतीत कोणता संघ बाजी मारतोय ते…

देशी खेळाडूंचा ठसा

गेल्या वर्षी हिंदुस्थानच्या वर्ल्ड कपसाठीच्या संघात स्थान न दिल्यामुळे कमालीचा नाराज झालेला अंबाती रायुडू याने पहिल्या लढतीत धडाकेबाज अर्धशतक झळकावून चेन्नई सुपरकिंग्सला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. पीयूष चावला, रवींद्र जाडेजा यांनीही चमक दाखवली. आता या संघात शार्दूल ठाकूर, कर्ण शर्मासारख्या हिंदुस्थानी खेळाडूंना चान्स मिळतोय का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

परदेशी खेळाडूंवर अवलंबून

शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने पहिल्याच मोसमात जेतेपद पटकावले. त्यानंतर मात्र त्यांना या स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घालता आलेली नाही. यंदा ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव स्मिथच्या खांद्यावर या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पण पहिल्या लढतीत त्याच्या खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तसेच सुरूवातीच्या लढतीत बेन स्टोक्स व जोस बटलरची अनुपस्थिती या संघाला जाणवणार आहे. याशिवाय जोफ्रा आर्चर, टॉम करण, डेव्हिड मिलर या परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवरही संघाचे भवितव्य अवलंबून असेल. संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा या हिंदुस्थानी खेळाडूंवरही साऱयांच्या नजरा असणार आहेत.

सॅम करण, फाफ डय़ुप्लेसिस यांच्याकडून पुन्हा अपेक्षा

पहिल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्ससाठी सॅम करण व फाफ डय़ुप्लेसिस या परदेशी क्रिकेटपटूंनी मोलाचे योगदान दिले. लुंगी एनगिडी याच्या गोलंदाजीवर 38 धावांची लूट करण्यात आली असली तरी त्याने महत्त्वाच्या क्षणी तीन फलंदाज बाद केले. अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलेल्या चार परदेशी क्रिकेटपटूंपैकी फक्त शेन वॉटसनलाच अपयशाचा सामना करावा लागला. याच कारणामुळे याच खेळाडूंकडून पुन्हा एकदा अपेक्षा बाळगल्या जाऊ शकतात. तसेच आता उद्याच्या लढतीसाठी इम्रान ताहीर, मिचेल सॅण्टनर व जोश हेझलवूड या परदेशी क्रिकेटपटूंपैकी कोणा एकाला तरी संघात स्थान देण्यात येईल असे वाटत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या