ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे तोंड आंबट, IPLसाठी दौरा अर्धवट सोडण्यास क्रिकेटपटूंना परवानगी

IPL 2022 इंडीयन प्रिमिअर लीगच्या 15वा हंगामात 8 ऐवजी 10 संघांचा समावेश असणार आहे. आगामी सीझन मार्च महिन्यात सुरू होणार असून तो मे महिन्यात संपणार आहे. विविध देशातील क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटूही याला अपवाद नाहीत. यंदा मात्र आयपीएलच्या हंगामादरम्यान ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा आला असल्याने त्यांच्या संघातील क्रिकेटपटूंसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. पाकिस्तान दौऱ्यातील 3 एकदिवसीय सामने, एक टी20 सामना आणि आयपीएलचा हंगाम हे एकाचवेळी आले आहेत. यावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघ निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी तोडगा काढला आहे. हा तोडगा ऐकल्याने पाकिस्तानचं तोंड आंबट झालं आहे.

आयपीएलमध्ये ज्या क्रिकेटपटूंना भाग घ्यायचा असेल त्या क्रिकेटपटूंना आयपीएलपूर्वी घरी जाण्याची परवानगी असेल असं जॉर्ज बेली यांनी जाहीर केलं आहे. बेली यांनी म्हटलंय की , ‘एकापेक्षा जास्त प्रकाराचे क्रिकेट सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना थोडी तयारी करण्याची गरज असते. शारीरिकरित्या मजबूत राहणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं, खासकरून गोलंदाजांसाठी.’ मोठ्या लीगमध्ये भाग घेतल्याने जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंकडून त्यांना शिकायला मिळत असतं, त्यामुळे त्यांना प्रोत्साहीत केलं जातं असंही बेली यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की पाकिस्तान दौऱ्यापेक्षा ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू हे आयपीएलला जास्त प्राधान्य देताना दिसतायत.