ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू कोहलीशी प्रेमाने का वागतात? मायकल क्लार्कने केला गौप्यस्फोट

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तिथले खेळाडू हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला मुद्दाम उचकवत नाहीत, त्याच्याशी वाद घालत नाही असं क्लार्कचं म्हणणं आहे. अत्यंत आक्रमक मानले जाणारे हे क्रिकेटपटू कोहलीशी सौजन्याने वागतात असं निरीक्षण त्याने नोंदवलं आहे. यामागचे कारणही त्याने सांगितले आहे जे धक्कादायक आहे.

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू हे अत्यंत शिवराळ आणि आक्रमक मानले जातात. लयीत असलेल्या फलंदाजाला अथवा गोलंदाजाला बिथरवण्यासाठी ते त्याला शिव्या देतात किंवा बाष्कळ बडबड करून हैराण करून सोडतात. मात्र हे चित्र विराट कोहलीबाबत बघायला मिळत नाही असं क्लार्कचं म्हणणं आहे. त्याने एका रेडियोला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की सगळ्यांना माहिती आहे की हिंदुस्थानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो अथवा आयपील तिथले क्रिकेटजगत आर्थिकदृष्ट्या किती मजबूत आहे. त्याने या मुलाखतीमध्ये पुढे बोलताना म्हटलं की 2018-2019 साली हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. या दौऱ्याच्यावेळी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू कोहली आणि त्याच्या संघाला घाबरलेले दिसत होते कारण एप्रिल 2019 मध्ये त्यांना या संघातील खेळाडूंसोबतच आयपीएल सामने खेळायचे होते. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू कोहलीला डिवचत नव्हते कारण त्यांना भीती वाटत होती की याचा IPL मधल्या त्यांच्या करारावर वाईट परिणाम होईल आणि कदाचित कोट्यवधी रुपयांवर त्यांना पाणी सोडावं लागेल.

क्लार्कने या मुलाखतीमध्ये सांगितलं की विराट हा रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरूचा कर्णधार आहे तर रोहित शर्मा हा मुंबई इंडीयन्सचा कर्णधार आहे. या दोघांची भूमिका खेळाडू निवडीमध्ये अत्यंत महत्वाची असते. ऑस्ट्रेलियाच्या सरस कामगिरी करणाऱ्या 10 क्रिकेटपटूंमध्ये या दोघांच्या संघात येण्यासाठी चढाओढ असते. असा स्थितीत मी कोहलीला डीवचलं नाही, त्याच्याबद्दल अपशब्द काढले नाही तर मला त्याच्या संघात स्थान मिळेल आणि 6 आठवड्यात 10 लाख डॉलर्सची कमाई करता येईल असा या क्रिकेटपटूंचा विचार असतो असं क्लार्कने म्हटलं आहे. क्लार्कने ज्या मालिकेचा उल्लेख केला आहे त्या मालिकेमध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 ने पराभूत केलं होतं. अशी कामगिरी करणारा तो आशियाई खंडातला पहिला देश ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या