पूनम राऊत, मिताली राजचे दमदार अर्धशतक

337

मराठमोळी पूनम राऊत व कर्णधार मिताली राज यांची दमदार अर्धशतके… हरमनप्रीत कौरच्या नाबाद 39 धावा… अन् शिखा पांडे, एकता बिष्ट व पूनम यादव यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी येथे झालेल्या दुसऱया वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 5 गडी व 12 चेंडू राखून धूळ चारली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. 65 धावांची खेळी साकारणाऱया पूनम राऊत हिची ‘वुमन ऑफ दी मॅच’ म्हणून निवड करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानसमोर 248 धावांचे आव्हान ठेवले. पहिल्या लढतीत प्रिया पुनिया व जेमिमा रॉड्रिग्स या सलामीवीरांनी आपला ठसा उमटवला होता, पण या लढतीत दोघींनाही मोठी खेळी करता आली नाही. प्रिया पुनिया 20 धावांवर तर जेमिमा रॉड्रिग्स 18 धावांवर बाद झाली. त्यानंतर मिताली राज व पूनम राऊत या जोडीने तिसऱया विकेटसाठी 129 धावांची भागीदारी रचली. मिताली राजने 8 चौकारांसह 66 धावांची आणि पूनम राऊतने 7 चौकारांसह 65 धावांची खेळी साकारली. मेरीझेन कॅपने मिताली राजला आणि अयाबोंगो खाकाने पूनम राऊतला बाद केले. त्यानंतर हरमनप्रीत कौरने नाबाद 39 धावा करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पाहुण्यांना रोखले

हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. हिंदुस्थानी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना रोखून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. शिखा पांडे, एकता बिष्ट व पूनम यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्डट् हिने सर्वाधिक 69 धावांची खेळी साकारली.

आपली प्रतिक्रिया द्या