85 वर्षांनंतर रणजी क्रिकेटमध्ये घडला इतिहास!

1458

रणजी ट्रॉफी स्पर्धेत गुरुवारी एका नव्या विक्रमाची नोंद झाली. स्पर्धेच्या 85 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर विजय मिळवला. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्रिपुरा विरुद्ध झारखंड यांच्यातील लढतीत फॉलोऑनची नामुष्की पत्करलेल्या झारखंड संघाने दुसऱ्या डावात नेटाने फलंदाजी करीत यजमान त्रिपुरा संघावर 54 धावांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला. विशेष म्हणजे या विजयाची तुलना टीम इंडियाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयाशी केली जात आहे.

त्रिपुराने घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करत 289 धावा केल्या. उत्तरादाखल झारखंड संघाचा पहिला डाव 136 धावात गडगडला. चार दिवसांच्या या सामन्यात पहिल्या डावात जो संघ 150 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतो तो प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देतो. दुसऱ्या डावात देखील झारखंडचा डाव कोसळला. झारखंडला डावाने पराभव टाळण्यासाठी केवळ 15 धावांची गरज होती आणि त्यांचा निम्मा संघ बाद झाला होता. इशांक जग्गी आणि सौरभ तिवारी मैदानात होते. पण जग्गी (207 चेंडुत 107) आणि तिवारी (नाबाद 122 ) या जोडीने 190 चेंडूंत 122 धावांची शतकी भागीदारी रचत झारखंडला सुस्थितीत पोचवले. झारखंडने आपला दुसरा डाव 8 बाद 418 धावांवर घोषित केला.

विजयासाठीचे 266 धावांचे आव्हान गाठताना यजमान त्रिपुरा संघ पार दबावात खेळला. त्यांचा डाव दुसरा डाव 211 धावांतच गुंडाळत झारखंडने ऐतिहासिक विजय नोंदवला. झारखंडचा जलदगती गोलंदाज आशिष कुमारने पाच विकेट घेत त्रिपुराचा पराभव निश्चित केला. त्रिपुराकडून एम.बी.मुरासिंहने 103 धावांची खेळी केली. सामन्यात अखेरच्या षटकात आशिषने राणा दत्ताला बाद करत सनसनाटी विजय मिळवला.

संघ व्यवस्थापक सिंह यांनी दिला कठीण विजयाचा विश्वास
झारखंडच्या संघाचा या सामन्यात पराभव होणार असे सर्वानीच गृहीत धरले होते. पण दुसऱ्या डावात लंचच्या वेळेस संघाचे व्यवस्थापक पी.एन.सिंह यांनी जग्गी यांना झारखंडचा संघ सामना जिंकू शकतो हा विश्वास आपल्या खेळाडूंना दिला. सिंह यांनी जग्गीला, ईडन गार्डन्सचा इतिहास पुन्हा घडणार? असा प्रश्न विचारला. त्यावर जग्गी याने कधी कधी इतिहास पुन्हा घडतो. पण प्रत्येक वेळी नाही, असे उत्तर दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या