नवरात्रीच्या पूर्वसंध्येस ‘कांगारू’ मर्दन; सूर्या तळपला, कोहली झळकला!

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या तिसऱया क्रिकेट सामन्यात यजमान हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवत टी-20 मालिका जिंकली. अक्षर पटेलच्या भन्नाट गोलंदाजीनंतर सूर्यकुमार यादव व विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावत हिंदुस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात बाजी मारल्यानंतर हिंदुस्थानने लागोपाठ दोन विजय मिळवत ही मालिका 2-1 फरकाने जिंकली. ‘सामनावीर’ सूर्यकुमार यादव या विजयाचा शिल्पकार ठरला, तर ‘मालिकावीरा’चा बहुमान फिरकीवीर अक्षर पटेलने पटकावला.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 186 धावसंख्या उभारली. यात कॅमरून ग्रीन (52) व टीम डेव्हिड (54) यांनी अर्धशतके झळकावली. ग्रीनने 21 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार ठोकले, तर डेव्हिडने 27 चेंडूंत 2 चौकारांसह 4 षटकारांचा घणाघात केला. जोश इंग्लिश (24) व डॅनियल सॅम्स (नाबाद 28) हे इतर दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. कर्णधार ऍरोन फिंच (7), स्टीव्हन स्मिथ (9), ग्लेन मॅक्सवेल (6) व मॅथ्यू वेड (1) हे महत्त्वाचे फलंदाज अपयशी ठरल्याने ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला ब्रेक लागला. हिंदुस्थानकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कोहली, सूर्याची अर्धशतके

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले 187 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 19.5 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची अडखळती सुरुवात झाली होती. लोकेश राहुल (1) व कर्णधार रोहित शर्मा (17) ही सलामीची जोडी लवकर तंबूत परतली. मात्र त्यानंतर विराट कोहली (63) व सूर्यकुमार यादव (69) यांनी दणकेबाज अर्धशतके झळकावली. या दोघांनी तिसऱया विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला विजयाच्या वाटेवर नेले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत 36 चेंडूंत 5 सणसणीत चौकार व तितक्याच टोलेजंग षटकारांची आतषबाजी केली, तर कोहलीने 48 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह आपली खेळी सजवली. हे दोघे बाद झाल्यानंतर हार्दिक पांडय़ाने 16 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह नाबाद 25 धावांची खेळी करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने चौकार मारून सामना संपवला, तर दिनेश कार्तिक एका धावेवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्सने 2, तर जोश हेजलवूड व पॅट कमिन्स यांनी 1-1 विकेट घेतली.

सामनावीर सूर्यकुमार

चेंडू      36

धावा     69

चौकार   5

षटकार   5