कोहलीमध्ये दिसते इम्रानची झलक, संजय मांजरेकर यांनी केली तुलना

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिकेत घवघवीत यश संपादन केले. अखेरच्या तीन सामन्यांत पराभवाच्या छायेतून बाहेर येत टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी कर्णधार विराट कोहलीची पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानशी तुलना करताना म्हटले की, विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांमध्ये इम्रान खानची झलक पाहायला मिळते.

इम्रान खानच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केलीय. पाकिस्तानचा संघ पराभवानजीक असताना इम्रान खानच्या नेतृत्वात खेळाडू सर्वस्व पणाला लावायचे आणि लढतीला कलाटणी मिळायची. स्वतःवरील विश्वास दृढ असल्यास हे शक्य होते. विराट कोहलीची सेनाही अगदी त्याचप्रमाणे खेळ करताना दिसत आहे, असे संजय मांजरेकर पुढे आवर्जून म्हणाले.

माहीसाठी कमबॅक कठीणच – कपिल देव

महेंद्रसिंह धोनीने वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय लढत खेळलेली नाही. हिंदुस्थानी संघाचा माजी कर्णधार कमबॅक करू शकेल का, असा प्रश्न कपिलदेव यांना विचारला असता ते म्हणाले, महेंद्रसिंह धोनी गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाहीए. अशा परिस्थितीत त्याचे पुनरागमन कठीणच दिसतेय. पण तो आयपीएल खेळू शकतो. तसेच निवड समितीवरही बरेच काही अवलंबून आहे. शिवाय संघासाठी काय योग्य आहे याबाबतचा अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन घेईल, असेही कपिलदेव पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या