स्टोक्स जंटलमन योद्धा!

501

द्वारकानाथ संझगिरी

थकलेल्या शरीराने, पण आनंदाने तुडुंब भरलेल्या मनाने काल मी लॉर्डस्वरून बाहेर पडलो तेव्हा माझा मित्र मला म्हणाला, ‘यापेक्षा चांगली मॅच होऊ शकते?’

मी म्हटलं, ‘‘वेडा आहेस का? स्वतःला भाग्यवान समज तू लॉर्डस्वर होतास. क्रिकेटचा देव यापेक्षा रहस्यमय नाटक प्रसवू शकत नाही. परफेक्शन कॅन नॉट बी इंप्रूव्हड (Perfection cannot be improved). त्याने त्याची सर्वोत्कृष्ट निर्मिती क्रिकेटच्या सर्वोच्च नाटय़गृहात पेश केली. कॅसिनोमध्ये रुलेटमध्ये सोंगटी गर गर फिरते तसं यश देवाने गर्र गर्र फिरवलं आणि ते इंग्लंडसमोर येऊन थांबलं. स्टोक्स आणि पर्यायाने इंग्लंडसारखं नशीबवान कुणी नाही आणि न्यूझीलंड व विल्यमसनसारखं दुर्दैवी.’’

या एका मॅचने इंग्लंडला 44 वर्षांनंतर क्रिकेटचा विश्वचषक मिळवून दिला. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटला पुन्हा लोकप्रियतेच्या वरच्या स्तरावर आणलं. आज ब्रेकफास्ट घेण्यापूर्वी मी चार वर्तमानपत्र विकत घेऊन आलो (इंग्लंडमध्ये एक वर्तमानपत्र विकत घ्यायलाही मराठी माणसाला मोठी छाती लागते. एका दिवसाच्या वर्तमानपत्राची किंमत एका मराठी पुस्तकाएव्हढी असते.). सर्व वर्तमानपत्रांत क्रिकेट पहिल्या पानावर आहे. इंग्लंडमध्ये क्रिकेट खूप वर्षांनी पहिल्या पानावर आलं. विम्बल्डन म्हणजे इंग्लंडचा क्रीडा कॅलेंडरचा मानबिंदू. तिथल्या फेडरर-जोकोविच लढतीतही लंबक वेडय़ासारखा फेडररकडून जोकोविचकडे फेऱ्या मारत होता. तरीही क्रिकेटने त्यावर मात करून पहिलं पान गाठलं. आमचा लाडका सर नेव्हील कार्डस् म्हणतो, There can be no summer in this Land of the cricket. त्याचं म्हणणं आता दीर्घकाळ अबाधित राहू शकतं.

इथे वर्तमानपत्रं चाळताना एका छायाचित्राने मला मोहित केलं. ‘डेली मेल’च्या मुखपुष्ठावर बेन स्टोक्सची बायको क्लेअर त्याचं आवेगाने  चुंबन घेतानाचा फोटो आहे. ते तिच्या नवऱ्याचं चुंबन नव्हतं ते विश्वचषकाचं चुंबन होतं. बेन स्टोकने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्याच सामन्यात विश्वचषकातला सर्वोत्कृष्ट झेल घेतला होता. काल तो सर्वोत्कृष्ट खेळी खेळला. यापुढे बेन स्टोक्सचा मोबाईल नंबर इंग्लंडच्या इमरर्जन्सी सर्व्हिसेसच्या यादीत सापडला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याने प्रत्येक वेळी इंग्लिश संघाला आणिबाणीच्या परिस्थितीतून बाहेर काढलं. मग ती त्यांची हिंदुस्थानविरुद्धची मॅच असो किंवा श्रीलंका-ऑस्ट्रेलियाविरुद्ध. कमांडोसारखा आला आणि कमांडोसारखा लढला. काही वेळा तो लढता लढता कोसळला आणि अंतिम सामन्यात जेव्हा इतिहास खुणावत होता तेव्हा घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून त्याने इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये आपलं नाव अजरामर केलं. विश्वचषकातल्या अंतिम सामन्यातल्या  अनेक महान खेळी मी 1983पासून पाहिल्या आहेत. किती महान खेळाडूंनी अविष्कार पेश केलाय. इंजमाम, अरविंद डिसिल्व्हा, पॉटिंग, ऍडम गिलख्रिस्ट, जयवर्धने, धोनी वगैरे वगैरे. पण ही खेळी वेगळीच होती. खेळपट्टी फलंदाजांना मोठय़ा फटक्यांना अनुकूल नव्हती. चेंडू हलत होता. अधूनमधून थांबून येत होता. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो डोक्यावर कोलन वॉटरची थंड घडी ठेवून क्रिकेटच्या ओव्हनमध्ये लढला. जिंकण्यासाठी लढण्याची ती परिसीमा होती. तो आणि बटलर मोठी भागीदारी करेपर्यंत इंग्लंड चौथ्या अंतिम सामन्यात हरणार असं वाटत होतं. पण जसजसा इंग्लंडला आपल्या खांद्यावरून विजयाजवळ घेऊन जायला लागला तसं त्या ओव्हनचं तापमान वाढत गेलं. पावलापावलावर त्याला नवं संकट येत होतं आणि पावलापावलावर त्याला नवा विचार करायला लागत होता. आणि मुख्य म्हणजे एखाद्या प्रामाणिक चुकीला माफी नव्हती. चूक म्हणजे संपलं! स्टोक्सची ही लढण्याची वृत्ती त्याच्या रक्तात आहे. तुमच्यातली आक्रमकता, लढाऊ वृत्ती, न हरण्याची जिद्द चांगल्यासाठी वापरता येते आणि कधी वाईटसाठीसुद्धा. पूर्वी ती आक्रमकता वाईट मार्गाने चालली होती. दोन वर्षांपूर्वी बिअर व्होडका, टकिला शॉट्सच्या नशेत त्याने दोघांना ब्रिस्टॉलच्या नाईक क्लबमध्ये बदडून काढले होते. 2011 साली क्रम्ब्रीया (crumbria) मध्ये त्याने थेट पोलिसांच्या मार्गात अडथळा आणला. 2013च्या ऍशेस सीरिजच्या वेळी लेट नाईट मद्यपानामुळे त्याला इंग्लंडला परत पाठवलं होतं. एकदा चिडून त्याने लॉकर रूममध्ये लॉकरवर इतका जोरात ठोसा मारला की त्याचा हात तुटला. त्याच्या संघातल्या मित्रांनी त्याचं नाव “The hurt Locker”  असं ठेवलं होतं. तो मैदानाबाहेर ‘वाल्या’ होता. आता तो वाल्मीकी झाला आणि त्याने ती आक्रमकता मैदानावर इंग्लंडला जिंकून देण्याकडे वळवली.

सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात एक ‘जंटलमन’ आहे. तो योद्धा वाटतो. अंगावर ‘माओरी’ टॅटू मिरवतो. ‘स्टोक’ हा शब्द ‘स्टोक्स’चा  अपभ्रंश आहे असं वाटावा असा आक्रमक असतो. पण लाव्हा वाहत असतानाही त्याच्यातला सद्गृहस्थ जागा असतो. न्यूझीलंडच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण होतं तो गप्टीलचा थ्रो. ज्या गप्टीलने एक असामान्य थ्रो करून उपांत्य फेरीत धोनीला धावचीत केलं आणि अंतिम सामन्याचं फाटक उघडलं. त्याचं गप्टीलच्या थ्रोने न्यूझीलंडची इतिहासाबरोबरची भेट रद्द केली. अर्थात त्यात गप्टीलची चूक नव्हती. क्रिझमध्ये येण्यासाठी ड्राईव्ह मारताना स्टोकच्या बॅटला चेंडू लागला आणि सीमारेषेकडे भरधाव गेला आणि सहा धावा मिळाल्या. त्या सहा धावा स्वीकारताना त्याने हात वर करून न्यूझीलंड संघाची माफी मागितली. असा संकेत पाळला जातो की अशावेळी फलंदाज ओव्हर थ्रोवर धावा घेत नाही. त्याने समोरच्या फलंदाजाला थांबवलं. कदाचित त्याच्या सद्वर्तनाचं बक्षीस म्हणून चेंडू थेट सीमारेषेपर्यंत एकटा धावत गेला. देवाची पटकथाच तशी होती तो काय करणार! तो मग केन विल्यमसनला म्हणाला, ‘मी तुला या सहा धावांसाठी आयुष्यभर सॉरी म्हणत राहणार आहे.’

पण मॅच टाय झाल्यावर मनात कुठलीही अपराधीपणाची भावना न ठेवता तो सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीला आला. त्याला घाम पुसायलाही वेळ मिळाला नसेल. पेट्रोल संपत आलंय याचीसुद्धा त्याला जाणीव झाली असेल. पण पेट्रोल ‘रिझर्व्ह’वर असताना त्याने इंग्लंडला जिंकून दिले. लॉर्डस्ला फलंदाज जेव्हा ड्रेसिंग रूममधून बाहेर येतो तेव्हा लॉगरूममधून जाताना अनेक महान खेळाडूंच्या तसबिरी ओलांडत तो पुढे जातो. तिथे एक तसबिर आहे. इंग्लंडच्या महिलांनी जिंकलेल्या विश्वचषकाचा तिथे फोटो आहे. त्या फोटोने त्याला स्फूर्ती दिली असेल. तो पुन्हा त्या सुपर षटकात घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढला. न्यूझीलंडच्या ओव्हरपूर्वी असे विनोदाने सर्व म्हणायला लागले की, ते षटक स्टोकला द्यावं. त्याचं नशीब आज जोरावर आहे. असेलही पण त्याने इंग्लिश क्रिकेट संघातल्या प्रत्येकाच्या हातावर विश्वचषक विजयाची रेघ उमटवली आणि नियतीच्या नाटकाची गंमत पहा, तर कुणाविरुद्ध? ज्या देशात तो जन्माला आला त्या न्यूझीलंडविरुद्ध.

त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी तो इंग्लंडमध्ये आला. कारण त्याच्या वडिलांना इंग्लंडमध्ये  प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळाली. काल वडील न्यूझीलंडला चिअरअप करीत होते आणि मुलगा इंग्लंडला जिंकून देण्याचे शर्थीने प्रयत्न करत होता. हे फक्त इंग्लंडमध्ये घडतं आणि स्वीकारलं जातं.

दैव मात्र न्यूझीलंडच्या विल्यसनवर रुसलं. मला दैवाचा न्यायबुद्धीचा राग आला. चौकार-षटकारांचा ‘अश्मयुगा’तला नियम बनवणाऱ्यांचाही राग आला. एक सज्जन, गुणवान, मेहनती लहान मुलाने आदर्श ठेवावा. अशा क्रिकेटपटूला दैवाने असा धोका का द्यावा, काय चूक केली त्याने? संपूर्ण विश्व चषकात संघाच्या धावांची सूटकेस डोक्यावर घेऊन तो फिरला. त्याचे गोलंदाजीतील बदल, त्याचे क्षेत्ररचना, त्याचे प्रत्येक फलंदाजाचे दोष आणि शक्तिस्थान पाहून रचलेले डावपेच मुख्य म्हणजे मैदानावर आणि मैदानाबाहेरची वागणूक, त्याचा हसरा चेहरा यामुळे तो क्रिकेटशौकिनांच्या गळय़ातला ताईत झाला आहे. किती अन्याय त्याच्यावर झाला पाहा.

मॅरेडोनाने जसं 1985च्या फुटबॉल विश्व चषकात त्याच्या गोलचं वर्णन ‘हॅण्ड ऑफ गॉड’ केलं होतं तसं या विजयाचं वर्णन ‘बॅट ऑफ गॉड’ असं करता येईल. आता सायमन टौफेलने  आणखीन एक मुद्दा मांडलाय. ओव्हर थ्रोची धाव देताना फलंदाजांनी एकमेकांना निदान ओलांडलं पाहिजे. टीव्ही रिप्लेप्रमाणे त्यांनी एकमेकांना ओलांडलं नव्हतं याचा अर्थ इंग्लंडला सहाऐवजी पाच धावा द्यायला हव्यात. तसं झालं असतं तर इंग्लंड जिंकलं नसतं. बरं, हा प्रसंग घडला तेव्हा दोन्ही पंचात चर्चा झाली. नेमक्या किती धावा द्यायच्या आणि स्ट्राइक कोणाला द्यायचा याबद्दल पंचांच्या मनात संशय असेल तर त्यांनी तिसऱ्या पंचाकडे केस सोपवायला हवी होती. तसं केलं असतं तर इंग्लंडला पाचच धावा मिळाल्या असत्या आणि स्ट्राइक स्टोक्सला मिळाला नसता. कुमार धर्मसेनासारखा टुकार पंच कसा पॅनेलवर आहे देव जाणे.

आणि शेवटी चौकारावर सामना बहाल करणे हा नियम तर हास्यास्पद आहे. अर्थात तो नियम दोन्ही संघांना आधी ठाऊक होता. त्याकडे ‘बॅडलक’ म्हणूनच न्यूझीलंडला पाहावं लागेल. पण विषय आता बदलायला हवा. कुठलाही संघ उद्या मॅच टाय होईल म्हणून चौकारांची संख्या वाढवण्याचा विचार करतो का? आणि संघ जर त्या सामन्यात तुल्यबळ ठरले तर चॅम्पियनशिप वाटून द्यायला काय हरकत आहे. समजा रविवार-सोमवार पाऊस पडून मॅच झाली नसती तर विजेतेपद वाटूनच दिलं असतं ना? जर एकाच संघाला द्यायचं असेल तर काही तरी चांगल्या नियमाचा विचार करायला हवा. नाही तर हे लॉटरी काढणं झालं. पण तसाही हा विषाचा प्याला विल्यमसन आणि न्यूझीलंडच्या संघाने कुठलीही कुरबूर, कुठलीही टीका न करता ओठाला लावला. सभ्यतेच्या कुठल्याही मर्यादा त्यांनी ओलांडल्या नाहीत. ते विष पचवताना वेदना झाल्या नसतील? भयानक झाल्या असतील. पण त्यांनी त्या जगाला जाणवू दिल्या नाहीत. म्हणूनच विल्यमसन आणि त्याचा संघ हरूनही जिंकला असं वाटलं आणि विल्यमसनबद्दल आदर द्विगुणित झाला.

(इंग्लिश ब्रेकफास्ट आज इथेच संपवतोय)

आपली प्रतिक्रिया द्या