cricket world cup 2019 इंग्लंडला गरज ऍम्ब्युलन्सची

66

द्वारकानाथ संझगिरी [email protected]

सध्या इंग्लिश संघाला ऍम्ब्युलन्सची गरज आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एका पराभवाने इंग्लंडच्या संघाची तब्येत खालावली. तीन मोठय़ा सामन्यांवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता रंजक व्हायला लागली आहे. त्या वेस्ट इंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटने उसळणारे रक्त क्षणभर रोखले असते तरी काल न्यूझीलंडचा संघ हरला असता आणि स्पर्धेत आणखीन रंगत आली असती.

परवा साउदम्प्टनवर प्रेसबॉक्समध्ये हिंदुस्थान – अफगाणिस्तान सामन्याचा मॅच रिपोर्ट संपवत असताना माझा एक डोळा टीव्हीवर चाललेल्या विंडीज – न्यूझीलंड मॅचवर होता. ‘2 बाद 142 आणि गेल खेळतोय’ ही न्यूझीलंडचा संघ वादळग्रस्त होण्याची पूर्व परिस्थिती आहे असे वाटत होते, पण ते वादळ आलेच नाही. गेल बाद झाला. मग पुन्हा इतर विंडीज कोसळले. मग मी लिहिण्यात गर्क झालो. माझी कॉपी लिहून संपली. ‘सामना’ला पाठविली आणि समोर पाहिले तर ब्रेथवेट आला होता. त्याने सॅन्टनरला दोन षटकारइतके सहज मारले की त्याच्या बॅटने चेंडूला फक्त टिचकी मारली असे वाटले. तिथून रूमवर गेलो. मॅच लावली आणि पहातो तर ‘वादळ आलंय’. फक्त वादळाचे नाव बदललंय. त्याचे नाव ब्रॅथवेट होते. या वादळाला कोण विसरेल. 2016 च्या टी-20 च्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सच्या मोठय़ा आतडय़ातून त्याने मॅच काढून घेतली होती. इथेही असे वाटले की त्याने विल्यमसनच्या आतडय़ात हात घातलाय. फक्त सहा धावा जिंकायला हव्या होत्या आणि 8 चेंडू होते. कुठल्याही नॉर्मल माणसाने आरामात त्या काढल्या असत्या, पण ब्रेथवेटला षटकाराचा मोह आवरला नाही. तो षटकार मारायला गेला आणि बोल्टने त्याचा झेल घेतला. बरे 48 व्या षटकात त्याने मॅट हेन्रीला लागोपाठ तीन षटकार ठोकले होते. पण वेस्ट इंडियन रक्ताला अजून 8 चेंडूत 6 धावा काढायच्या, थोडा दूरचा, पण राजरस्ता मान्य नसतो. त्याला शॉर्टकट हवा होता. रोमांच हवा होता. रोमहर्षक शेवट करायचा होता. यश मिळाले की, अशावेळी खेळाडू हिरो होतो. आणि अपयश मिळालं की? जेफ बायकॉट असता तर ‘व्हॉट अ स्टुपिड शॉट’ असे त्याने वर्णन केले असते. हे पाखराचे दिव्यावर झडप घालणे होते. मला त्यातही खूप वाईट वाटले. वेस्ट इंडीज जिंकली असती तर न्यूझीलंडवरही दबाव पडला असता. त्यांनाही आता यापुढे मोठय़ा संघाबरोबर खेळायचेय. स्पर्धेचे इंग्लंडने गुलाबी केलेले गाल, अधिक गुलाबी झाले असते. अशाच एका षटकाराबद्दल मोईन अली शिव्या खातोय. इंग्लंडमध्ये मोईन अलीवर टीका करताना आपल्यावर बेशिस्त आरोप होणार नाहीत याबाबत सर्व लेखक जागृत असतात. मग तो नासिर हुसेन असो किंवा जेफ बायकॉट टीका केल्यानंतर एक कौतुकाचा शाब्दिक गुच्छ त्याला देण्यात येतो. त्याने धनंजय डिसिल्व्हाच्या पार्टटाइमला ऑफस्पिनवर एक षटकार ठोकला. परत ती रोमहर्षकता अनुभवायचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला. तिथून इंग्लंडचे पटाचे फासे पूर्णपणे फिरले. मला एक जुना किस्सा आठवतोय. इंग्लंडच्या वॉल्टर रॉबिन्स या क्षेत्ररक्षकाने एकदा डॉन ब्रॅडमनचा झेल सोडला. त्यानंतर तो कर्णधार गबी ऍलनला म्हणाला, ‘सॉरी कॅप्टन.’ गबी ऍलन म्हणाला, ‘काळजी करू नकोस. तू ऍशेसचा झेल सोडलास.’  इंग्लंडचा संघ जर बादफेरीत पोहोचला नाही तर मोईन अलीच्या नशिबी वॉल्टर रॉबिन्सचे दुर्दैव येऊ शकते.

एक पराभव एखाद्या संघाचा आत्मविश्वास किती लयाला घेऊन जाऊ शकतो, याचे इंग्लंडचा संघ हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आधी त्यांनी हवा अशी निर्माण केली की यावेळी नियतीने इंग्लंडला वर्ल्डकप बहाल केलाय. पाकिस्तानबरोबर हरल्यानंतरही माज फार कमी झाला नव्हता. त्याने इयॉन मॉर्गनने ती अफगाणिस्तान विरुद्ध खेळी केली त्यानंतर पुन्हा कौतुकाचे पाट वाहिले गेले. श्रीलंकेविरुद्ध अचानक फ्युज गेला आणि सर्वत्र त्यांना अंधार दिसायला लागला. आता ते फ्युजच्या शोधात निघाले आहेत, पण ते दुकान नेमके कुठलं असेल ते त्यांना कळत नाहीय. हिंदुस्थान, न्यूझीलंड की ऑस्ट्रेलिया?

इंग्लंडचे फलंदाज हे टणटणीत खेळपट्टीचे सरदार आहेत. त्यांना वाळलेल्या गवताच्या रंगाची खेळपट्टी पावते. धुवाँधार फलंदाजी करतील. इंग्लिशमध्ये म्हण आहे, ‘‘Make Hay when sunshines” वाळलेल्या गवताच्या रंगाच्या खेळपट्टीवर ते या म्हणीला जागतात. खेळपट्टीवर किंचित हिरवटपणा असू देत किंवा चेंडू हवेत हलू देत किंवा वळू देत ते गडबडले. कारण त्यांनी डावपेच Hit through the line  असे ठेवलेत. पाटय़ावर ते चालून जाते. मग ते कुठलीही गोलंदाजी डाळीसारखी वाटतात. चेंडू हलला, वळला की तो उद्योग बंद होतो. बदलत्या खेळपट्टीशी जुळवून घेत फलंदाजी करावी लागते. ती फक्त त्यांच्या जो रुटला जमते. कारण तो तंत्रशुद्धी फलंदाजी करतो. त्यामुळे तो एकटाच श्रीलंकेविरुद्ध खेळला. हेडिंग्ले लीड्स हे रूटचे स्वतःचे अंगण. तिथले क्रिकेटपट्टू ही इंग्लंडची कडवी जमात. आपल्या मुंबईच्या खेळाडूंसारखी! सरजॅक हॉब्ज, सर लेन हटन, जेफ बायकॉटसारखे दिग्गज इंग्लिश फलंदाज तिथलेच. त्यांनी स्वर्गातून मॅच पाहिली असेल तर तोंड लपवले असते.

इंग्लंडला त्यांच्या अतिरेकी आक्रमणाला आवर घालायला हवा. त्यांना त्यांची फलंदाजी तळापर्यंत आहे, याचा फार मोठा गर्व आहे. ते खरंय, पण बायकॉट विचारतो ‘‘आठ, नऊ, दहा, अकरा क्रमांकाचे खेळाडू किती मॅचेस जिंकून देतात? ज्यावेळी वर धावा होतात तेव्हा हे तळाचे फलंदाज मोठे फटके मारून कळस चढवू शकतात. पण कळसाचे काम करणारे फलंदाज पाया रचू शकत नाहीत. त्यात जेसन रॉयच्या मांडीच्या दुखावलेल्या स्नायूनंतर ती सुरुवातीची बुलंद फलंदाजी संपलीय. यॉर्कशायरवर बेअरस्ट्रो दोनदा पहिल्या चेंडूवर बाद झालाय. त्यामुळे अचानक ताकदवान इंग्लिश फलंदाजी कचकडय़ाची त्यांना स्वतःलाच वाटायला लागली आहे.

बरे आता त्यांच्या उरलेल्या प्रतिस्पर्ध्यांपैकी ऑस्ट्रेलिया विरुद्ध लॉर्डस्ला खेळायचे. तिथे वॉर्नरची बॅट आता अधिक रूंद होतेय. श्रीलंकेविरुद्धही मलिंगाच्या यॉर्कर्सनी वाट लावली. ऑस्ट्रेलियाकडे स्टार्क आहे. 15 विकेट्स त्यांच्या आधीच खिशात आहेत. यॉर्करप्रमाणे उसळता चेंडू हे त्याचे प्रभावी अस्र आहे. एक हिंदुस्थानी संघ सोडला तर त्याने इतरांविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केलीय. मुळात ऑस्ट्रेलियाची मूलभूत आक्रमकता एका वेगळय़ाच स्तरावरची आहे. हिंदुस्थानबरोबर त्यांना एजबॅस्टनला खेळायचेय. ती खेळपट्टी  हेडिंग्ले लीडसच्या जवळच्या नात्यातली आहे आणि हिंदुस्थानी गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आहे. न्यूझीलंड राज्यकर्ती टीम वाटत नाही. पण कठीण प्रसंगात जिंकत जाते. त्यांचा कर्णधार विल्यमसन भन्नाट फॉर्ममध्ये आहे.

एकंदरीत कुठल्या दुकानातून इंग्लंड गेलेला फ्युज विकत घेणार हे कोडेच आहे. प्रत्येक ठिकाणी किंमत मोठी आहे. आणि तो विकत घेतल्याशिवाय पुन्हा झगमगाट शक्य नाही. मध्यंतरी व्हिव रिचर्डस म्हणाला होता, इंग्लिश संघ दबावाखाली कसा खेळतो ते मला पहायचे आहे. खरे तर संपूर्ण इंग्लंडचेच त्याकडे डोळे लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या