त्यांचं व्यक्तिमत्त्व मनावर ठसलं!

85

द्वारकानाथ संझगिरी [email protected]

2019च्या विश्वचषकात काही खेळाडूंची शैली, त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्त्व माझ्या मनावर ठसलं. त्या खेळाडूंचं यशापयश, वेगवेगळय़ा शैली, वेगवेगळे ऍप्रोच याची मला तुलना करावीशी वाटते.

त्या तीन जोडय़ा आहेत.

  • 1) रोहित शर्मा – जेसन रॉय
  • 2) मिचेल स्टार्क – जसप्रित बुमरा
  • 3) विराट कोहली -इयान मॉर्गन

तर आधी  रोहित शर्मा-जेसन रॉय’दोघेही आघाडीचे फलंदाज – त्या दोघांशिवाय त्यांच्या संघाचं पान हलत नव्हतं. रोहित शर्मा कसोटीत म्हणावा तसा यशस्वी झालेला नाही. जेसन रॉय येत्या ऍशेस लढतीत कसोटी कारकीर्दीला सुरुवात करणार आहे, पण दोघेही असे फलंदाज आहेत, ज्यांना पाहण्यासाठी मी पैसे खर्च करेन. (फुकट पास मिळविणाऱ्या, वर चहा-पाणी, जेवणखाणं मिळणाऱ्या पत्रकाराला तिकीट काढणं किती कष्टाची गोष्ट असेल, विचार करा!) या वर्ल्डकपची अकरा जणांची टीम काढली तर आघाडीला हे दोघे असतात. वॉर्नर कदाचित अधिक यशस्वी असेल, पण यांची प्रेक्षणीयता वेगळीच आहे.

रोहित शर्मा म्हणजे फलंदाजीची नजाकत. जेसन रॉय म्हणजे नयनरम्य घणाघात.रोहितच्या फटक्याला ‘फटका’ म्हणणे तितकंसं योग्य वाटत नाही. चेंडूला इजा होणार नाही याची त्याची बॅट काळजी घेते. एकदा विश्वनाथच्या बाबतीत मी लिहिलं होतं. विश्वनाथच्या बॅटला बोलता आलं असतं तर फटका खेळल्यावर तिने सानेगुरुजींच्या शैलीत चेंडूला विचारलं असतं, ‘‘बाळा, तुला लागलं तर नाही ना?’’ रोहितच्या बाबतीत माझी हीच भावना आहे. जेसन रॉयचा फटका हा घाव असतो. मला चेंडूची दया येते. रोहित धावा घेतो तेव्हा गोलंदाजाला लुटलं गेल्याची भावना होत नाही. टायमिंगच्या अनॅस्थेसियामुळे वेदना जाणवत नाहीत. रॉयच्या फटक्यांच्या तीक्र वेदना फलंदाजाला जाणवतात. परवाच्या सेमिफायनलमध्ये त्याने दोन कव्हर ड्राईव्हज् स्टार्कला मारले ते पाहताना माझ्या अंगावर काटा आला. सतत गवत भीतीने शहारलेलं दिसलं. स्टार्क आतून पूर्णपणे भाजला असेल. जवळपास बंद प्रेस बॉक्समध्ये त्या फटक्यांचा आवाज घुमला. रोहितच्या फटक्यांचा आवाज मुलायम असतो. तलत मेहमूदच्या गाण्यासारखा. जेसन रॉयच्या फटक्याचा आवाज महंमद रफीप्रमाणे टिपेला पोहोचतो.

रोहितचं मूलभूत तंत्र चांगलं असलं तरी दर्जेदार स्विंगसमोर सुरुवातीला त्याचा बचाव चिरेबंदी वाटत नाही. जेसन रॉयचं तंत्र चांगलं आहे, पण त्याची खरी कसोटी लागेल कसोटी सामन्यात. जेव्हा चेंडू लाल असेल. तो जास्त स्विंग होईल. मागे स्लिप्स गली असतील तेव्हा; पण पांढऱ्या चेंडूवर तो थ्रू लाइन उत्तम मारू शकतो.

दोघांकडे फटक्यांची मुबलकता मोठी आहे. आक्रमण करायला त्यांना पुस्तकाबाहेरचं जास्त इंप्रोव्हायझेशन लागत नाही. अर्थात फटक्यांच्या पुस्तकाची सुधारित आवृत्ती लक्षात घेऊन मी हे बोलतोय, पण जेसन मोठे फटके समोरच्या ‘व्ही’मध्ये मारतो. रोहित जवळपास जेसनच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करू शकतो, पण रॉयची आक्रमकता जास्त डोळय़ात भरते. परवा नाथन लायन गोलंदाजीला आला तेव्हा फक्त एक क्षेत्ररक्षक ऑनला होता. बाकी सर्व ऑनला सीमारेषेवर गस्त घालत होते. दुसऱ्या कुणीही नाथन लॉयनचा पहिला चेंडू ऑनला ढकलून धाव घेतली असती. कदाचित दोन-तीन धावा! फक्त या वर्तुळातल्या क्षेत्ररक्षकाला तर ओलांडायचं होतं! तो सरळ पुढे सरसावला आणि त्याने नाथनला षटकार ठोकला. बॉयकॉटने असा विचार स्वप्नातही केला नसता. बदललेल्या इंग्लिश क्रिकेटचा जेसन रॉय हा बिनीचा शिलेदार आहे. म्हणूनच तो जायबंदी झाल्यावर ‘दोन’ऐवजी ‘दीड’ पायावर खेळण्याची त्याने तयारी दाखवल्यावर त्याला इंग्लंडने घेतला आणि त्याने इंग्लंडला अंतिम फेरीत आणून सोडलं.दोघांना एकत्र पाहणं, त्यांच्या फटक्यांचे ते आवाज ऐकणे, मदन मोहन-आर.डी. बर्मनच्या फ्युजनसारखं असेल. काही सतारीच्या पिसेस तर काही वेळा बेस गिटारचा ऱिहदम.

बुमरा – स्टार्क,कुठलीही देशप्रेमाची भावना न बाळगता म्हणेन की, आज बुमरा जास्त श्रेष्ठ ठरलाय. काल-परवापर्यंत स्टार्क हा जगातला सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज होता. आता तो मुकुट बुमराच्या डोक्यावर हवा. स्टार्कने लॉर्डस्वर इंग्लंडला हादरवून टाकल्यावर इंग्लिश टीकाकारांनी त्याच्यावर कौतुकाची फुलं ओंजळ ओंजळ भरून टाकली. त्यांची उंची, त्याचा वेग, त्याचा यॉर्कर याबद्दल वाद नाही. तो मोठाच गोलंदाज आहे, पण याक्षणी बुमरा हा सर्वसमावेशक वेगवान गोलंदाजीला पर्यायी शब्द आहे. स्टार्कला हिंदुस्थानी फलंदाजांनी झोडून काढला. एजबॅस्टनवर टॉप-रूट-मॉर्गनने त्याची गोलंदाजी धुऊन, वाळवून इस्त्र्ााr करून ऑस्ट्रेलियन कर्णधाराकडे दिली. वर्ल्ड कपच्या हिंदुस्थानच्या दहा सामन्यांत एकदाही बुमराला कुणी फोडून काढल्याचं मला स्मरत नाही. इंग्लंडबरोबर आपण हरलो, पण जेसन रॉय – बेअस्टॉच्या बॅटने बुमराची गोलंदाजी सन्मानाने वागवली. त्याचं मुख्य कारण म्हणजे, खेळपट्टीचं मन चटकन ओळखून त्याने आपला टप्पा त्याप्रमाणे जुळवून घेतला. कुठे लेंग्थ बॉलचा उपयोग करायचा. कुठे किंचित शॉर्ट ऑफ लेंग्थ टाकायची याची त्याला जाण मोठी होतीच, पण त्याचबरोबर तसं टाकणं हे सोपं नाही. कारण तो रोबो नाही, पण त्याचं डोकं, त्याचे हात हे एका मशीनचे भाग असल्याप्रमाणे अचूकता दाखवायचे.

स्टार्क – बुमरा दोघेही यॉर्कर्स उत्तम टाकतात, पण बुमराकडे इतर विविधता प्रचंड आहे. वन डेचे नियम असे आहेत की, गोलंदाज ही फलंदाजांना फटक्यासाठी चेंडू पुरवणारी मशिन्स झाली आहेत, पण त्यामुळे ज्या गोलंदाजांनी डोकं वापरून आणि सरावाने विविध नवे चेंडू तयार केले, त्यात प्रभुत्व मिळवलं, त्यात एक बुमरा आहे. वन डेत त्याच्या वाटेला साठ चेंडू येतात. त्यात तो किती वैविध्य दाखवतो पाहा. तो स्विंग करतो, मोठा आऊट स्विंग नसेल, पण चेंडू बाहेर काढतो, सिम करतो, कट् करतो. नकल बॉल टाकतो. नेहमीचा बाऊन्सर, स्लो बाऊन्सर, यॉर्कर, स्लो यॉर्कर सर्व टाकतो. त्यात त्याचा वेग सरासरी 140 किलोमीटर्सचा असतो. त्याचा बाऊन्स फलंदाजाच्या गळय़ाचा वेध घेतो. त्याच्या बाऊन्सरवर हुक, पुल, अपर कट् सोपे नसतात. तो चेंडू एकाच वेळी डबल कट् किंवा डबल स्विंग करत नाही. कारण तो मग जादूचा प्रयोग होईल. बुमरा काही जादूगार नाही. जेसन रॉयला जर तुम्ही चॉईस दिलात की स्टार्कला खेळायचं की बुमराला. तो स्टार्क म्हणून किंचाळेल. वर तुम्हाला शॅम्पेन देईल बुमराला टाळण्यासाठी.

विराट कोहली – इयान मॉर्गन,विश्वचषकामधल्या दोन महत्त्वाच्या संघाचे दोन कर्णधार.विराट हा मॉर्गनपेक्षा कितीतरी पटीने मोठा फलंदाज आहे. त्याबद्दल अख्खं इंग्लंड तुमच्याशी वाद घालणार नाही, पण विराटने कमालीचा हट्टीपणा आणि आपली हुकूमशाही दाखवली. त्याने आपले डावपेच बदललेच नाहीत. ‘‘पाच गोलंदाज म्हणजे पाच गोलंदाज, चौथ्या क्रमांकावर धोनी नाही म्हणजे नाही. विजय शंकर हवा म्हणजे हवा.’’

हिंदुस्थानी संघात सर्वच आलबेल नाही. विराटचे आवडते आणि नावडते किंवा कमी आवडते असा भेदभाव संघात आहे. पूर्वी हा मुंबईचा, तो दिल्लीचा, तिसरा बंगलोरचा वगैरे जातीभेद होते. निवड समितीच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम व्हायचा. आता नवीन जाती व्यवस्था आहे, हा चेन्नई सुपरकिंगचा. हा किंगफिशरचा. तो आणखीन कुठला. विराटच बोर्ड चालवतो. त्यामुळे कुंबळेला जावं लागलं. निवड समिती विराटनं निवडलेल्या संघावर स्वाक्षरी करते असं वाटावं इतपत त्याचा त्यात हात असतो. त्यामुळे प्रत्येक सामन्यात संघनिवड चुकत होती. यश मिळत असताना या गोष्टी डोकं वर काढत नाहीत. त्यामुळे त्या दबलेल्या होत्या. आता त्या बाहेर यायला लागतील.

त्याउलट मॉर्गन आहे. बऱ्यापैकी शांत, पण दृढनिश्चयी. वेगळे डावपेच असणारा आणि अंगावर जबाबदारी घेणारा. उदा. परवाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये लेगस्पिनर रशिदने पहिल्या 4 षटकांत 29 धावा देऊनही त्याला त्याने बाजूला केलं नाही. कुठल्याही कर्णधाराला तो मोह झाला असता, पण त्याचं अंतर्मन त्याला सांगत होतं. ‘‘त्याला तसाच ठेव’’ त्याने मनाचं ऐकलं. रशिदने तीन महत्त्वाच्या विकेट्स काढून दिल्या. स्मिथ-मॅक्सवेल भागीदारी ही ऑस्ट्रेलियाची शेवटची आशा होती. ती फोडण्यासाठी त्याने ऑर्थरचा अख्खा स्पेल संपवला. त्याने नकल बॉलवर मॅक्सवेलला चकवलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला मर्यादा पडल्या.

भर वर्ल्ड कपच्या मध्यावर इंग्लंड कोसळत असताना त्याच्यावर पिटरसनने बाऊन्सरपासून पळण्याचा आरोप ठेवला. त्याने चित्त विचलित होऊ दिलं नाही. परवा स्टार्क-कमिन्सच्या बाऊन्सरला कर्णधाराने साजेसं प्रत्युत्तर दिलं. तो त्यांचा सर्वोत्कृष्ट फलंदाज नसेल, पण इंग्लिश क्रिकेटचं स्वरूप बदलणारा कर्णधार आहे हे संघ मानतो आणि त्याच्यासाठी उभा राहतो म्हणून एक संघ घरी परततो, दुसरा लॉर्डस्वर जातो.

आपली प्रतिक्रिया द्या