रोहीतचे खणखणीत शतक, चहलच्या चार विकेट; हिंदुस्थानचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

सामना ऑनलाईन, साउदम्प्टन

युजवेंद्र चहलचा लढतीला कलाटणी देणारा स्पेल… जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार या तेजगोळीचा जबरदस्त मारा… आणि रोहीत शर्माचे खणखणीत शतक याच्या जोरावर हिंदुस्थानने बुधवारी दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि दोन गुणांची कमाई केली. 23वे शतक झळकावणाऱ्या रोहीत शर्माची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

चहलने घेतली मधल्या फळीची फिरकी

सलामीची जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसीस (38) व रॅसी वॅन दर डुसेन (22) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी 54 धावांची भागीदारी करीत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र  युजवेंद्र चहलने 20व्या षटकातील पहिल्या चेंडूवर डुसेन, तर शेवटच्या चेंडूवर डू प्लेसीस या दोघांचेही त्रिफळे उडवून हिंदुस्थानला मोठे यश मिळवून दिले.

महत्त्वपूर्ण भागीदारी

हिंदुस्थानचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर सलामीवीर रोहीत शर्माने लोकेश राहुलसोबत (26 धावा) 85 धावांची आणि महेंद्रसिंह धोनीसोबत (34 धावा) 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. कॅगिसो रबाडाने लोकेश राहुलला तर ख्रिस मॉरीसने महेंद्रसिंह धोनीला बाद केले. रोहीत शर्माने 144 चेंडूंत दोन शानदार षटकार व 13 नेत्रदीपक चौकारांसह नाबाद 122 धावांची देदीप्यमान खेळी साकारत टीम इंडियाचा विजय सुकर केला. हार्दिक पांडय़ाने नाबाद 15 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानपुढे 228 धावांचे आव्हान ठेवले. मात्र कॅगिसो रबाडाने शिखर धवनला 8 धावांवर बाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर फेहलुक्वायोने कोहलीलाही बाद केले.

मॅन ऑफ दि मॅच -रोहीत शर्मा

धावफलक

दक्षिण आफ्रिका-फाफ डू प्लेसीस त्रि.गो. चहल 38, रॅसी वॅन दर डय़ुसेन त्रि.गो. चहल 31, डेव्हिड मिलर झे.गो. चहल 31, ऍण्डील फेहलुक्वायो यष्टिचीत धोनी गो. चहल 34, ख्रिस मॉरीस झे. कोहली गो. भुवनेश्वर 42, कॅगिसो रबाडा नाबाद 31 अवांतर-10, एकूण-9 बाद 227 धावा गोलंदाजी-भुवनेश्वर कुमार 10-0-44-2, जसप्रीत बुमराह 10-1-35-2, कुलदीप यादव 10-0-46-1, युजवेंद्र चहल 10-0-51-4

हिंदुस्थान-रोहीत नाबाद 122, राहुल झे. डय़ुप्लेसीस गो. रबाडा 26, धोनी झे. आणि गो. मॉरीस 34 अवांतर-7, एकूण-4 बाद 230 धावा गोलंदाजी-कॅगिसो रबाडा 10-1-39-2, ख्रिस मॉरीस 10-3-36-1

विजयी संघ- हिंदुस्थान