मुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा!

93

सामना ऑनलाईन । लंडन

‘निसटत्या पराभवाचे शल्य सारेच पचवू शकत नाहीत. म्हणून मुलांनो चुकूनही क्रीडा क्षेत्रात येऊ नका. त्यापेक्षा आचारी पेशा पत्करून वयाच्या साठीपर्यंत आनंदी जीवन जगा’, असे हताश ट्वीट न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जिमी निशाम याने लॉर्ड्सवरील रविवारच्या विश्वचषक क्रिकेट लढतीतील आपल्या संघाच्या निसटत्या पराभवानंतर केले. पराभवानंतर जिमी नीशमने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये त्याने लहान मुलांना भविष्यात क्रीडा क्षेत्रात न येण्याचा सल्लाही दिला आहे.

सामना संपल्यानतर निशामने एकूण तीन ट्वीट केलेत. त्याचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वप्रथम त्याने, ‘हे दुःखद आहे… अशी अपेक्षा ठेवतो की पुढील दशकभरात किमान एक-दोन दिवस तरी असे येतील की या सामन्याच्या अखेरच्या अर्ध्या तासाबाबत मनात विचार येणार नाही. इंग्लंडला शुभेच्छा! ते विजयाचे दावेदार होते’, हे ट्वीट केलं. ‘दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व समर्थकांचे आभार. दिवसभर तुमचा आवाज आम्ही ऐकला पण तुम्हाला अपेक्षित निकाल आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व’, असं म्हटले आहे.

निशामने भावनांना वाट मोकळी करून दिली
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने न्यूझीलंड संघातील अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम खूपच हताश असल्याचं दिसतंय. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात अधिक चौकार मारल्याच्या निकषावरुन इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आलं. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडसाठी जिमी निशाम फलंदाजीसाठी आला होता, त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार देखील खेचला. मात्र संघाला विजेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

पराभवानंतर नीशमने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स यांने न्यूझीलंडच्या पराभवानंतर मैदानात अश्रू ढाळणाऱ्या निशामचे सांत्वन केले. ‘यश -अपयश हा खेळाचा येऊ भाग आहे.तो मनाला फार लावून घेऊ नकोस.तुम्ही पराभूत झाला असलात तरी क्रिकेटशौकिनांची मने तुमच्या खेळाने जिंकली आहेत. यातच सारे काही आले’, अशी समजूत वोक्सने काढली.

आपली प्रतिक्रिया द्या