इंग्लंडमध्ये ‘भारतमाता की जय’चा नारा!

द्वारकानाथ संझगिरी

क्रिकेटमध्ये धावा किंवा विकेटस् माणसाचं नशीब, लौकिक, लोकप्रियता बदलतात. पाच वर्षांपूर्वी कोहलीची विकेट ऍण्डरसनने आपली मालमत्ता बनवली होती. तेव्हा कोहलीला इंग्लंडमध्ये किंमत नव्हती. गेल्या वर्षी त्याने इंग्लंडमध्ये धावा कुटल्या. खरं तर लुटल्या, ऍण्डरसनकडून आपल्या विकेटची मालमत्ता हिसकावून घेतली. त्यानंतर जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याचा इथे इंग्लंडमध्ये जयजयकार केला जातोय.

इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनने ट्विट करून त्याचा कोहलीबद्दलचा आदर व्यक्त केलाय. इंग्लंडच्या फुटबॉलच्या कॅप्टनवर जर्मनीच्या थॉमस म्युलर या फुटबॉल कर्णधाराने कडी केलीय. त्यानेसुद्धा कोहलीला सलाम ठोकलाय. खरं तर जर्मनीचा आणि क्रिकेटचा तसा संबंध नाही. बरं, इंग्लंडमध्ये वातावरण क्रिकेट विश्वचषकमय अजिबात नाही. इंग्लिश वर्तमानपत्र उघडलं की, पहिली आठ पानं फुटबॉलला वाहिलेली असतात. मग क्रिकेट सुरू होतं आणि पटकन संपतं. फ्रान्समध्ये महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप आहे. त्याच्या पुरवण्या येतायत. इंग्लंडला विश्वचषक जिंकायची सर्वात जास्त संधी आहे तरीही इथे फुटबॉल लता मंगेशकर असेल तर क्रिकेट शमशाद बेगम आहे. आणि म्हणून जेव्हा इंग्लंडचा आणि जर्मनीचा फुटबॉलचा कर्णधार कोहलीच्या प्रेमात पडतात तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो.

इंग्लंडमध्ये खेळताना हिंदुस्थानी संघाला अलीकडे आपल्या अंगणात खेळतोय असंच वाटतं. सगळीकडे तिरंगे लहरत असतात. एकेकाळी तिरंगा फडकवला म्हणून स्वतःच्या देशात हिंदुस्थानींनी लाठय़ा आणि गोळय़ा खाल्ल्या. आता ब्रिटिश पासपोर्ट बाळगणारे हिंदुस्थानीसुद्धा ब्रिटनमध्ये झेंडे फडकवतात. ‘भारतमाता की जय’ म्हणतात. संपूर्ण स्टॅण्ड भरून टाकतात. गोरा माणूस ते मनातल्या मनात हताशपणे पाहत असावा, पण हाताची घडी आणि तोंडावर बोट याशिवाय त्यांना पर्याय नाही. पूर्वी इथले हिंदुस्थानी फॅन्स सचिनचा मास्क घालत होते. आता कोहलीचे मास्क घालतात. साऊथम्प्टनला ‘Keep calm and Trust Kohli’ असे बॅनर्स काही मंडळींच्या हातात होते. तो फलंदाजीला आल्यावर स्टॅण्डमधून ‘कोहली कोहली’ असा जयजयकार झाला, पण प्रेक्षकांचं मन हे हिंदी सिनेमातल्या नटीपेक्षा चंचल असतं. एक प्रेमप्रकरण सुरू असताना दुसऱ्याशी डेटिंग केलं जाऊ शकते. हिंदुस्थानी प्रेक्षकांचं डेटिंग आता रोहित शर्माबरोबर सुरू आहे. त्याच्या एका शतकाने एक नवा हीरो प्रेक्षकांना सापडलाय. परवा साऊथम्प्टनला मॅच संपल्यावर अनेक हिंदुस्थानी प्रेक्षक हिंदुस्थानी संघाच्या गाडीभोवती जमले होते आणि ओठावर घोषणा होती, ‘रोहित रोहित’. खरं तर ती ‘चहल चहल चहल’ अशीसुद्धा असायला हरकत नव्हती, पण दुर्दैवाने बऱ्याचदा गोलंदाज हा आपला हीरो नसतो, तो चरित्र अभिनेता असतो. शेन वॉर्न, मुरलीधरनसारखे अपवाद फार थोडे असतात.

अर्थात रोहितचं कौतुक होणं नैसर्गिक आहे. मुळात रोहितची फलंदाजी पाहणं हा कलात्मक आनंद आहे. मायकेल एंजलोचं शिल्प, व्हॅन गॉगचं पेंटिंग किंवा लता मंगेशकरच्या ‘ओ सजना बरखा बहार आयी’ गाण्यातून जो कलात्मक आनंद मिळतो तो आपल्याला रोहितच्या फलंदाजीतून मिळतो. धावा या पर्क्स किंवा बोनस असतात; पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावा हा त्याच्या पगाराचा भाग होता. संघ नावाच्या कुटुंबाच्या सुखासाठी धावांचा मोठय़ात मोठा पगार मिळवायचाच या भावनेने तो खेळला. शतक झाल्यावर यशाकडे घोडदौड करण्याच्या घाईत त्याने विनाकारण एक साहसी फटका मारून हवेत पांढरं कबूतर सोडलं. सुदैवाने ते पकडलं नाही गेलं. तो फटका सोडला तर त्याच्या संपूर्ण खेळीवर जबाबदारीची भावना दिसत होती. हा नेहमीपेक्षा वेगळा रोहित शर्मा होता. आणि ही भूमिका त्याला विश्वचषक संपेपर्यंत निभावायची आहे.

तो आणि विराट हे आपले पॉपिंग क्रिझचे राजपुत्र आहेत. त्यांच्यापैकी एका राजपुत्राने शेवटपर्यंत उभं राहायची जबाबदारी घेतली तरी या विश्वचषकात आपली घोडदौड शेवटपर्यंत सुरू राहील.

या दोन मस्केटियर्सनंतर तिसरा मस्केटियरही आता मोठय़ा बातमीत आहे. तो देशप्रेमाचं प्रतीक झालाय. तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. त्याच्या ग्लोव्हज्च्या बलिदान लोगोने वादळ उठलंय. हिंदुस्थानी जनतेने त्याला पाठिंबा दिलाय. कुणीही देईल. आणि बीसीसीआय त्याच्यासाठी लढतेय हीच चांगली गोष्ट आहे. देश बीसीसीआयच्या पाठी आहे, पण तरीही काही मुद्दय़ांचा ऊहापोह व्हायला हवा.

वर्ल्ड कपचे ‘आईबाप’ आयसीसी आहेत. त्यांचे काही नियम आहेत. त्या नियमांत असा लोगो ग्लोव्हज्वर असणे बसते की नाही याबाबतीत आयसीसीच गोंधळात आहे. कारण तो धंदेवाईक लोगो नाही. जर हेल्मेटवर झेंडा लावून खेळता येत असेल तर बलिदान लोगो लावला तर बिघडलं कुठे? त्यामुळे आयसीसीने थोडी नरमाईची भूमिका घेऊन त्यामागे राजकीय, धार्मिक किंवा वर्णीय उद्देश नाही ना, हे बोर्डाला विचारलंय. दुसरा एखादा ‘छोटा’ देश असता तर ‘ए, गप ए. काढ सांगितलं म्हणजे काढायचं’ असा सज्जड दम दिला असता. आयसीसीला सत्तर टक्के पैसे हिंदुस्थानातून मिळतात. त्यामुळे हिंदुस्थानच्या बाबतीत त्यांची नरमाईची भूमिका असते, अशी कुजबुज आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाढलीय. बॉब विलिससारखा इंग्लिश क्रिकेटपटू तर उघडपणे म्हणतो की, आयसीसी हे हिंदुस्थानच्या ताटाखालचे मांजर आहे. आयपीएलमुळे पहिली मॅच हिंदुस्थानी संघ आरामात खेळतो हे त्याला खटकलं होतं. काहींच्या मते खेळपट्टय़ासुद्धा हिंदुस्थानी संघाला अनुकूल ठेवल्या जातील वगैरे वगैरे. पण या लोगोला परवानगी मिळाली तर इतर संघही असा उपद्व्याप  करू शकतात. हा विश्वचषक लोगोंच्या वादळाचा वर्ल्ड कप ठरू नये एवढंच म्हणणं!

आपली प्रतिक्रिया द्या