नवा जगज्जेता मिळणार!

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

एजबॅस्टनवर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्डस्ला झालेल्या प्रत्येक जखमेचा हिशेब चुकवला. इंग्लड आता ताठ मानेने त्यांच्या क्रिकेटच्या व्हॅटिकनमध्ये प्रवेश करेल. त्यांचा परफॉर्मन्स हा चॅम्पियन्सचा परफॉर्मन्स होता. पंधरा दिवसांपूर्वीचा इंग्लंडचा संघ आणि हा  इंग्लिश संघ यात लंडन-बर्मिंगहॅम एवढं अंतर आहे. लंडनला त्यांनी मान खाली घातली होती. हिंदुस्थानविरुद्ध जिंकल्यावर याच एजबॅस्टनवर ती वर आली आणि आज तिथेच ती ताठ झाली. आता क्रिकेट जगताला नवा ‘जेता’ संघ मिळणार हे मात्र निश्चित झालेय. कारण लॉर्डस्वर रविवारी विजेतेपदासाठी यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांत तुंबळ युद्ध रंगणार आहे. यातील एकाही संघाने यापूर्वी वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

त्यांच्यासाठी बाद फेरीचा दबाव वगैरे काही वेगळा दबाव नव्हता. कारण हिंदुस्थानविरुद्धच्या मॅचनंतर ते प्रत्येक मॅच बाद फेरीत असल्याप्रमाणेच खेळले. काल एजबॅस्टनवर टॉस हरल्यावरही त्यांच्या नीतीधैर्यावर परिणाम झाला नाही. उलट दबा धरलेल्या नागाने डसावे तसे त्यांचे गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजीला डसले. त्यांना दोन-तीन विकेटस् लवकर हव्या होत्या. त्यात एक होता सध्या खोऱ्यानं धावा करणारा वॉर्नर. तो सापडल्यावर अर्धी वनडे ते जिंकले. स्मिथ-कॅरीची लढाऊ भागीदारी फोडल्यानंतर ऑस्ट्रेलियन धावसंख्येचं उड्डाण घारीऐवजी कबूतराचं झालं. गोलंदाजांनी विकेटस् वाटून घेतल्या. मला लेगस्पिन टाकणाऱ्या रशीदने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ज्या पद्धतीने फसवलं ते आवडलं.

या खेळपट्टीवर 225 धावांचा पाठलाग मोठा नव्हता. पण रॉय जेसन-बेअरस्टॉच्या झंझावाती सुरुवातीने तो शिवाजी पार्कवरच्या वॉकएवढा सोपा केला. रॉयच्या फटक्यांचा आवाज मैदानात घुमत होता. स्टार्क हे त्यांचं ब्रह्मास्त्र्ा. त्याचे तुकडे तुकडे केले गेले. रॉयचे झंझावाती शतक श्रीलंकन पंच कुमार धर्मसेनाने होऊ दिलं नाही. रॉयला बाद दिल्यावर एवढा धक्का बसला की, त्याने रिव्हय़ू मागितला. रिव्हय़ू संपलाय याचं भानही त्याला राहिले नाही. पण तोपर्यंत इंग्लंडला फक्त एखाद्-दोन मजल्यांसह कळस चढवायचा होता. जो रुटने रॉयची बॅट घेऊन आल्यासारखी फलंदाजी केली. फक्त तिला क्लासिक फलंदाजीच्या चौकटीत बसवलं. मॉर्गनवर स्टॉकसह इतर गोलंदाजांनी बाऊन्सर टाकले, पण त्याने ते तितक्याच तडफेने फेकून दिले. ‘जुन्या वैऱ्यावर’ त्यांनी नुसती मात केली नाही, तर त्यांना जमीनदोस्त केलं.