
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही ‘टाइम 100’ नेक्स्टमध्ये स्थान मिळवणारी एकमेव हिंदुस्थानी क्रिकेटपटू ठरली आहे. हरमनप्रीतने विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंडय़ा आणि केएल राहुलसारख्या स्टार क्रिकेटपटूंना मागे टाकत ‘टाइम 100’ लीडर्सच्या यादीत स्थान मिळवले आहे, हे विशेष.
टाइमने जगभरातील 100 उदयोन्मुख नेत्यांची ‘टाइम 100’ नेक्स्ट यादी प्रसिद्ध केली आहे. ‘टाइम’ने आपल्या यादीत 100 अशा लोकांचा समावेश केला आहे जे भविष्याला आकार देत आहेत आणि पुढच्या पिढीच्या समोर एक आदर्श नेतृत्वाची व्याख्या तयार करत आहेत.
हरमनप्रीत कौरला ‘टाइम 100’ यादीतील इनोव्हेटर्स श्रेणीत स्थान मिळाले आहे. हरमनप्रीत कौरव्यतिरिक्त ‘टाइम 100’च्या या यादीमध्ये जालेन हर्ट्स, एंजल रीझ, रोनाल्ड अकुना ज्युनियर, रोझ झांग, सलमा पार्लुएलो आणि सोफिया स्मिथ यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.a