क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने अंत्यदर्शनालाही येता येणार नाही

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला पितृशोक झाला आहे. मोहम्मद सिराज याचे वडील मोहम्मद गाउस यांनी शुक्रवारी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दुःखद म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने सिराजला वडिलांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता येणार नाही.

मोहम्मद सिराज याचे वडील बऱ्याच कालावधी पासून फुफुसाच्या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर हैद्राबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी त्यांची मृत्यूशी झुंज संपली आणि प्राणज्योत मालवली.

‘स्पोर्ट्स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद सिराज टीम इंडिया सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला आहे. मात्र त्याचा क्वारंटाईन कालावधी अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्याला वडिलांच्या अंत्य दर्शनासाठी मायदेशी परत येता येणार नाही.

दरम्यान, नेट मधील सराव संपल्यावर सिराजने वडिलांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या मुलाने देशाचे नाव मोठे करावे अशी वडिलांची इच्छा होती. त्यांची ती इच्छा नक्कीच पूर्ण करेन’, असे सिराज म्हणाला. तसेच मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पाठीराखा गमावला आहे, असेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या