आयसीसीच्या नव्या नियमाचा पहिला फटका ‘या’ खेळाडूला

40

सामना ऑनलाईन । सिडनी

आयसीसीने क्रिकेटमध्ये लागू केलेले नवीन नियम २८ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या नवीन नियमांचा पहिला फटका ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसला आहे. क्विन्सलँडचा खेळाडू मार्नस लबसचेंजच्या ‘फेक फिल्डिंग’ प्रकरणी त्याच्या संघाला दंड करण्यात आला आहे.

आता क्रिकेटमध्येही रेड कार्ड; बेशिस्तीला थारा नाही

ऑस्ट्रेलियाच्या एका स्थानिक एकदिवसीय मालिकेत क्विन्सलँड बुल्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ संघात सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया-११चा खेळाडू परम पटेलने समोरच्या बाजूला एक जोरदार फटका मारला. मार्नस लबसचेंजने उजवीकडे झेप घेत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो अपयशी ठरला. तरीही त्याने ‘फेक थ्रो’ करत फलंदाजाला बुचकळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंचांनी यावर आक्षेप घेत आयसीसीच्या नव्या नियमानुसार क्विन्सलँड बुल्स संघाला ५ धावांचा दंड ठोठावला. नवीन नियम लागू केल्यानंतर फक्त २४ तासांत त्याचा वापर करण्यात आला आहे.

नवीन नियम ४१.५ नुसार, फलंदाजाने चेंडू टोलवल्यानंतर क्षेत्ररक्षणाने जाणूनबुजून फलंदाजाला उद्देशून शाब्दीक शेरेबाजी केली किंवा फलंदाजाचे लक्ष विचलीत करणारी कृती केली तर पंच त्या संघाला ५ धावांचा दंड ठोठावू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या