प्रत्येक ऋतु सारखाच

जयेंद्र लोंढे

सध्या मुंबईसह देशभरात थंडीची लाट पसरलेली दिसते. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीच्या गारठय़ातही शरीराची फिटनेस राखण्यासाठी जॉगिंग करणारे जागोजागी सापडतील. याप्रसंगी हिंदुस्थानातील स्टार खेळाडू कशाप्रकारे आपला सराव करीत असतील. याचे कुतूहल सर्वांनाच असेल. दैनिक सामनाने यावेळी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे, धावपटू कविता राऊत, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि कुस्तीपटू रेश्मा माने हिच्याशी साधलेला संवाद. थंडीत गुरफटून झोपण्याची मौज न्यारीच. पण काही गोष्टी या अशा असतात की ऋतू कोणताही असो पण कठोर परिश्रमाखेरीज पर्यायच नसतो आणि ज्यांना काहीतरी साध्य करायचे असते. त्यांच्यासाठी हे सगळे ऋतू सारखेच असतात. पाहूया आपले खेळाडू या थंडीत आपला सराव कसा करत असतील…

वीरधवल खाडे (जलतरण)

जलतरण या खेळामध्ये करिअर करणाऱया खेळाडूंचा वातावरणाशी काहीही संबंध नसतो. बंगळुरुत सात वर्षे निहार अमीन यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी उन्हाळा असो की पावसाळा की हिवाळा, पहाटे पाच वाजता ट्रेनिंगसाठी उठावेच लागत असे.

जलतरणपटूंना हिवाळ्यात अर्थातच थंडीमध्ये पिण्याच्या पाण्याशी निगडित काळजी घ्यावी लागते. थंड पाणी घशाला हानीकारक ठरू शकते. जलतरणातील पाण्यामध्ये टाकण्यात आलेल्या क्लोरीनमुळे फरक पडत असतो. यामध्ये फ्रीजमधील पाणी आणखीनच त्रासदायक ठरण्याची शक्यता बळावते.

जलतरणपटूंना कोणत्याही मोसमात आहारामध्ये बदल करण्याची गरज नसते. डाएट हा बहुतांशी एकसारखाच असतो. मोसमातील बदलानुसार शरीरामध्ये फरक पडत नसतो.

कविता राऊत (धावपटू)

जेथे स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे तेथील वातावरणानुसार सराव करावा लागतो. तेथील क्लायमेट सरावाचे टाइमटेबल ठरवते.

उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा कोणत्याही मोसमात धावपटूंना पहाटे चार वाजता उठून सराव करावाच लागतो. कोणत्याही परिस्थितीत ट्रकवर धावावेच लागते.

धावपटूंच्या डाएटमध्ये हिवाळ्यात कोणताही फरक पडत नाही. बाराही महिने एकसारखाच डाएट असतो.

थंडीत सराव करण्याचा फायदा म्हणजे घाम येत नाही. त्यामुळे आल्हाददायक वातावरणात धावण्याचा सराव करता येतो.

पृथ्वी शॉ (क्रिकेट)

मुंबईत मुळात कडाक्याची थंडी पडत नाही. त्यामुळे आहार, डाएटमध्ये बदल करावा लागत नाही.

क्रिकेटपटूचा मैदानातील सराव मोसमानुसार बदलत नाही. प्रशिक्षकांचे टाइमटेबल प्रामाणिकपणे स्वीकारावे लागते.

क्रिकेटचा सराव करताना थंडीच्या मोसमात फक्त स्वेटर घालून मैदानात उतरावे लागते. याव्यतिरिक्त जास्त बदल करावा लागत नाही.

क्षेत्ररक्षण करताना पडल्यास किंवा चेंडू हाताला लागल्यास जास्त मोठी इजा होऊ नये याची थंडीच्या काळात काळजी घ्यावी लागते.

रेश्मा माने (कुस्ती)

हिंदुस्थानात उत्तरेला हिवाळ्यात जास्त थंडी असते. त्यामानाने मुंबईत म्हणावा तेवढा गारवा दिसून येत नाही. बोचरी हवाही नसते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांशी विभागात कुस्तीचा सराव करताना मोठी अडचण निर्माण होत नाही

थंडीमध्ये कुस्तीचा सराव करताना बॉडी गरम रहावी यासाठी गरम कपडे घालावे लागतात. तसेच गरमागरम जेवणे खावे लागते.

कोणत्याही स्पर्धेआधी आठ दिवसांचा अवधी मिळाल्यास कसून सराव करता येतो. कोणतेही शहर असो किंवा देश असो. तसेच हिंदुस्थानातच नव्हे तर कोणत्याही देशात हिवाळ्यात स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्यास त्याआधी वातावरण जुळवून घ्यावे लागते. त्यानंतर तिथे आपली कामगिरी उंचावता येते.