केलं कुणी अन् भरणार कोण! धवनचा क्षणीक खेळ नावाड्याच्या अंगाशी, फोटो व्हायरल झाल्याने…

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन सध्या सुट्टी एन्जॉय करताना दिसतोय. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला धवन वाराणसीमध्ये गंगा नदीमध्ये होडीत बसून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटतोय. परंतु या दरम्यान त्याचा एक फोटो व्हायरल झाला आणि या फोटोमुळे होडी चालवणारा नावाडी अडचणीत आला आहे.

शिखर धवन याने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो गंगा नदीत होडीमध्ये बसून पक्ष्यांना दाणे खाऊ घालताना दिसतोय. धवनच्या या चुकीमुळे आता नावाड्याला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. कारण यामुळे नावाड्याचे लायसन्स रद्द होऊ शकते.

धवनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात गेले. सुनावणीदरम्यान न्यायाधीश कौशल राज शर्मा यांनी पर्यटक म्हणून आलेल्या धवनवर नाही, तर नावाड्यावर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

जिल्हा न्यायाधीश कौशल राज शर्मा म्हणाले की, ‘पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना नावेत बसून पक्ष्यांना दाणे खाऊ घालू देऊ नसे असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी आणि प्रशासनाने नावाड्यांनी दिले होते. जे कोणी हा नियम तोडतील त्याला नोटीस पाठवली जाईल आणि तुमचे लायसन्स का रद्द केले जाऊ नये असे विचारले जाईल. मात्र पर्यटकांनाविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही.’

…म्हणून पक्ष्यांना दाणे घालण्यास मनाई

सध्या देशात कोरोनासोबत बर्ड फ्लूचा देखील कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत असून यामुळे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमिवर वाराणसीमध्ये पर्यटकांना पक्ष्यांना दाणे खाऊ घालण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या