क्रिकेटर बनला मोबाईल चोर

सुरतच्या एका क्रिकेटपटूला भिकेचे डोहाळे लागले आहेत. मैदानात काही करून दाखवता आले नाही म्हणून तो सट्टा खेळू लागला. त्यातही तो लाखो रुपये हरला. त्यामुळे तो आता फसवणूक आणि चोऱ्या करू लागला. आशीष जैन (२४) असे त्या माजी क्रिकेटपटूचे नाव असून ताडदेव पोलिसांनी त्याला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

मूळचा सुरतचा असलेला आशीष हा गेल्या महिन्यात मुंबईत आला होता. महालक्ष्मी येथील हिरापन्नामध्ये तो एका मोबाईलच्या दुकानात गेला. तेथे त्याने आयफोन-८ हा मोबाईल बघायला मागितला आणि दुकानदाराची नजर चुकवून मोबाईलसह पोबारा केला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरुण थोरात, उपनिरीक्षक रणदिवे, पडावले तसेच सर्जिणे आणि पेडणेकर या पथकाने आशीष जैन या चोराला सुरत येथून पकडून आणले. आशीष हा आधी सुरतमध्ये अंडर-१९ च्या संघातून क्रिकेट खेळायचा. मैदानात त्याला काही करून दाखवता आले नाही. त्यामुळे तो हेराफेरी आणि चोरी करू लागला. सुरत पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे ताडदेव पोलिसांनी सांगितले.