विधवेने दिला लग्नास नकार; तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

1080

मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे एका विधवा महिलेने लग्नास नकार दिल्याने तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जितेंद्र वर्मा असं मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे महिलेवर एकतर्फी प्रेम होते. जितेंद्रला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र महिलेने नकार दिल्याने त्याने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला पतीच्या मृत्युपश्चात आपल्या माहेरी राहायला आली होती. या महिलेला एक मुलगी ही आहे. महिलेचे वय कमी असल्याने तिच्या घरातल्यांनी तिचं दुसरं लग्न करायचे ठरवले होते. याच दरम्यान लग्नासाठी जितेंद्र वर्मा महिलेस पाहण्यास तिच्या घरी आला होता. मात्र महिलेने लग्नास नकार दिला.

जितेंद्र महिलेशी एकतर्फी प्रेमात होता, त्यामुळे त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. तो महिलेवर आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. महिलेच्या सततच्या नकारला वैतागून शनिवारी सकाळी जितेंद्र देशी कट्टा घेऊन महिलेच्या घरी गेला. यावेळी त्याने तिला पुन्हा लग्नासाठी विचारले. महिलेने लग्नास नकार दिल्याने त्याने तिच्यासमोर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस महिलेशी अधिक चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या