देवगडमध्ये घरात लपवून ठेवला होता गांजा, पोलिसांनी कारवाई करत आरोपीसह गांजा केला जप्त

टेंबवली-कालवी येथील संतोष भास्कर पारकर (56) यांनी राहत्या घरात गांजा लपवून ठेवल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पारकर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या घरामध्ये धाड टाकून 2 किलो 158 किलो ग्रॅमचा 63 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी 1.35 वा. सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंबवली कालवी येथील संतोष भास्कर पारकर (56) यांनी आपल्या राहत्या घरी गांजा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांना मिळाली होती. या नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक संदिप भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह टेंबवली कालवी येथे दुपारी 1.35 वा. सुमारास पारकर यांच्या राहत्या घरामध्ये धाड टाकली. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. यानुसार श्वान ब्राओ यांच्या मदतीने घरामध्ये झडती घेतली असता गांजा असलेल्या एका खोलीमध्ये श्वान भुंकू लागला. त्या ठिकाणी झडती घेतली असता 2 किलो 158 किलो ग्रॅमचा गांजा सापडला. याचबरोबर एक वजनी काटा,मोबाईल व चिलीम जप्त करण्यात आली. सदरचा मुददेमाल व संशयीत आरोपी संतोष भास्कर पारकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची फिर्याद देवगड पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे. सदर गांज्याची किंमत ही 63 हजार रुपये आहे.श्वान पथकाबरोबर कारवाई करण्यासाठी रुपेश परब यांनी देखील काम पाहिले. सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र घाग,पोलीस उपनिरिक्षक आर.बी.शेळके,पोलीस हवालदार पी.एस.कदम, ए.ए.गंगावणे,केसरकर,ए.एस.तेली,इंगळे यांनी केली आहे. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र कांबळी करीत आहेत.