लग्नाला नकार दिल्याने सांगोल्यात तरुणीचा खून

लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात तरुणाने घटस्फोटीत तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना सांगोला तालुक्यातील कोळे येथे शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ऋतुजा दादासा मदने (वय 18, रा. ईराचीवाडी कोळे, ता. सांगोला) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला) असे फरार आरोपीचे नाव आहे. याबाबत पांडुरंग सरगर यांनी फिर्याद दिली आहे. ऋतुजा मदने हिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर सचिन हा ऋतुजाला लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. पण तिने पांडुरंग सरगर यांच्या सांगण्यावरून लग्नाला नकार दिल्यामुळे सचिन हा तिच्यावर चिडून होता. दरम्यान, शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास ऋतुजा हिची आई डेअरीवर दूध घालण्यास गेल्याची संधी साधून सचिन गडदे याने ऋतुजाला गाठले. त्याने पुन्हा लग्नाची मागणी घातली असता तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सचिनने धारदार हत्याराने तिच्यावर वार केले. यात ऋतुजा जागेवरच गतप्राण झाली.