मॉडेलिंगच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

सामना प्रतिनिधी । पिंपरी

चित्रपटात काम देण्याच्या व मॉडेलिंगच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना लोणावळ्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

सुरेश केसरीमल शाह (वय ६३) आणि गजराज शाह (वय ६०, दोघही रा. मालाड) अशी अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठांची नावे आहेत. याप्रकरणी सूरत, गुजरात येथील एका बावीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. चित्रपट आणि मॉडेलिंग क्षेत्रातील नामवंत मंडळी लोणावळ्यात येणार आहेत, असे सांगून संबंधित तरुणीला ऑडिशनच्या बहाण्याने लोणावळा येथील आश्रम व्हिला बंगल्यात बोलावून घेण्यात आले. त्या ठिकाणी विनयभंग केल्याचा आरोप या दोघा ज्येष्ठांवर आहे. या दोघांच्या तीन साथीदारांनी मोबाईलमध्ये तरुणीचे छायाचित्र घेऊन तिला धमकी दिली. तरुणी सूरतला परतल्यानंतर तिने ही गोष्ट मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर सूरत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो लोणावळा पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचे तीन साथीदार फरारी आहेत.