Crime news दुचाकी चोराला अटक, 17 गाड्या जप्त; पुण्यातील विश्रामबाग पोलिसांची धडक कारवाई

उमरगा तालुक्यातील माडज गावात दुचाकी चोरट्यास पुणे पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 17 गाड्या जप्त केल्या आहेत. विकास माने असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून त्याच्या माध्यमातून चोरीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता ाहे.

पुणे येथील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या एका पथकाने मंगळवारी सकाळी माडज येथे अचानक धाड घालून विकास माने यास ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलीस चौकशीमध्ये त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्याच्या घराजवळ 17 दुचाकी आढळल्या असून पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच तरुणाला अटक केली आहे.

दरम्यान, आरोपीच्या घराजवळून 17 गाडया ताब्यात घेण्यात आल्या असून या सर्व गाड्या पुणे येथील असल्याची माहिती मिळतेय. या गाडींची अद्याप विक्री झालेली नव्हती. सदर आरोपी केवळ साठवण करीत होता.आरोपी गेल्या अनेक वर्षापासून पुणे येथेच वास्तव्यास होता. त्यामुळे त्याच्या माध्यमातून दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विश्रामबाग पोलीस निरीक्षक राकेश सरडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार दुडमे, मयूर भोसले, प्रकाश बोरुडे, साताप्पा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.