पुण्यात दीडशे जणांना गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला गुजरातमधून अटक

मायक्रो फायनान्स कंपनीद्वारे तात्काळ कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने तब्बल दीडशे नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबर ‘बंटी – बबली’च्या जोडीला स्वारगेट पोलिसांनी गुजरातमधील सूरत येथून अटक केली. दोघांनी पुण्यात बनावट फायनान्स कंपनी उघडून त्याद्वारे नागरिकांना अर्थिक गंडा घातला. मागील काही महिन्यांपासून पोलीस त्यांच्या शोधात होते.

दिपाली जितेंद्र पौनिकर (32), हेमराज जिवनलाल भावसार (रा. सुमन सार्थक सोसायटी, सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दिपाली आणि हेमराज यांची जोडी युट्यूबवर प्रसिद्ध आहे. स्वारगेट भागातील एका फायनान्स कंपनीने लोन देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याबाबत जून महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. दिपाली आणि हेमराज या दोघांनी मिळून मायक्रो फायनान्स नावाची खोटी संस्था स्थापन केली. पुण्यातील मुकुंद नगर परिसरात या कंपनीचे कार्यालय थाटले. त्यानंतर अनेक गरजू लोकांना पंधरा दिवसांत कर्ज उपलब्ध करून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लाटले.

लोनसाठी आवश्यक कागदपत्रे आणि आगाऊ रक्कम भरण्याचे सांगत जवळपास 100 ते 150 लोकांकडून 12 लाख 30 हजार रुपये उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनूसार स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांचे पथक गुजरातला रवाना झाले. यानंतर येथील सूरत येथून दिपाली आणि भावसार यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील अ‍ॅड. अजिंक्य शिर्के यांनी काम पाहीले. आरोपींनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? किंवा फसवणूक करणारी त्यांची कुठली टोळी आहे का? लोकांकडून घेतलेली रक्कम त्यांनी कुठे ठेवली याचा तपास आता स्वारगेट पोलीस करत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, अंमलदार फिरोज शेख, शिवदत्त गायकवाड, मुकुंद तारू, संदीप घुले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

तात्काळ लोन मिळेल, या आशेने रिक्षाधारक, हमाल, गोरगरीब नागरिक आरोपींच्या संपर्कात आले. दोघांनी मिळून शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा घातला आहे. त्त्यांनी आणखी काही किती लोकांची फसवणूक केली याबाबत तपास सुरू आहे.
– अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे