उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र आईने आणि बापाने पोटच्या मुलींना विष पाजून मारल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसपीसहित पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.
ही थरकाप उडवणारी घटना बिजनौर गावातील अकबरपुर तिगरी येथील आहे. जिथे नाजरीन आणि तिचा नवरा फरमानने हादिया (8) आणि आफिया (10) वर्षांच्या मुलींना विष पाजून कायमचे झोपवले. नाजरीन ही मृत मुलींची सावत्र आई होती. या घटनेबाबत गावात समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ फरमानच्या घराबाहेर जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
घटना गंभीर असल्याने एसपी अभिषेक झा घटनास्थळी पोहोचले आणि मृत मुलींच्या बापाकडून संपूर्ण माहिती घेतली. बोलले जात आहे की, नाजरीन ही त्या दोन्ही मुलींची सावत्र आई होती. तर फरमान हा त्यांचा खरा बाप होता. फरमानने दोन वर्षांपूर्वी आपली पहिली पत्नी दिलशानाला तलाक देऊन नाजरीनशी दुसरा विवाह केला होता.
पहिली पत्नी दिलशानापासून फरमानला दोन मुली होत्या, नाजरीनला त्या आवडायच्या नाहीत. याच कारणामुळे मुली सावत्र आईकडे न राहता त्यांच्या आजोबांकडे राहायच्या. मात्र बुधवारी दोन्ही मुलं नाजरीकडे खेळायला आली होती. याच दरम्यान नाजरीन आणि फरमानने दोघींना विष पाजले.
पोलिसांनी मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. सोबत नाजरीन आणि फरमानला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तर दोन चिमुकलींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.