क्राईम पेट्रोलमध्ये काम करणार्‍या अभिनेत्रींनी केली चोरी, पोलिसांकडून अटक

क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया सारख्या सुप्रसिद्ध कार्यक्रमात काम करणार्‍या दोन अभिनेत्रींना चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे शुटिंग बंद झाल्याने दोघींचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघी एका ठिकाणी भाड्याने रहायला गेल्या आणि त्यांनी तिथून पैसे चोरी केले.

सुरभी श्रीवास्तव आणि मोसिना या दोघींनी क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया या टीव्ही मालिकांमध्ये तसेच काही वेबसीरीजमध्ये काम केले होते. लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद करण्यात आली होती. त्यामुळे दोघींना पैसे मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वी दोघींनी आरे कॉलनीच्या रॉयल पाम भागात एका इमारतीत भाड्याने घर घेतले होते. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती राहत होती.  दोघींनी आपल्या रूम पार्टर्नरचे 3 लाख 28 हजार रुपये चोरले आणि तिथून पळ काढला. रूम पार्टर्नरने या दोघींवर पैसे चोरल्याचा संशय व्यक्त केला. तेव्हा पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात सुरभी आणि मोसिना पैशांचे पाकिट घेऊन पळून जाताना दिसल्या.

पोलिसांनी दोघींचा कसून शोध घेऊन त्यांना अटक केली. सुरूवातीला दोघींनी आपण असे काही केले नसल्याचे सांगितले. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच दोघींनी आपला गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी दोघींकडून 50 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तसेच कोर्टाने दोघींना 23 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टीव्ही मालिकेत काम करणार्‍या व्यक्तीने चोरी करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी तारक मेहता मध्ये काम करणार्‍या व्यक्तीला सोन साखळी चोरी केल्या प्रकरणी अट करण्यात आली होती.

तारक मेहता का उल्टा या चष्मा या सुप्रसिद्ध हिंदी मालिकेतील एक कलाकार सोन साखळी चोर बनला होता. लाखो रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी तो चोरी करायला लागला होता. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.

मिराज कापरी हा मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमात छोटी भुमिका बजावली होती. तसेच थपकी प्यार की आणि मेरे अंगने मे या मालिकेतही छोट्या भुमिका बजावल्या होत्या. मिराजला सट्टा आणि जुगार खेळायचा नाद होता. सट्ट्यामध्ये तो 30 लाख रुपये हरला होता. म्हणून त्याने चोरी करण्यास सुरूवात केली. सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा कर्ज मिटवण्यासाठी आपण चोरी करत होतो अशी कबुली मिराजने दिली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या