‘तो’ विमानाने यायचा आणि चोरी करुन जायचा! पुण्यात ‘हायप्रोफाईल’ चोरट्याला बेड्या

1999

हैद्राबाद येथून विमानाने येऊन पुण्यासह राज्यातील विविध शहरात चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. या ‘हायप्रोफाईल’ चोरट्याने शहरात 82 चोरीसह तब्बल 127 गुन्हे केले आहे. त्याच्याकडून तब्बल 37 लाख 73 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुन्ना उर्फ सलीम कुरैशी (वय 46, रा.गोवंडी, मुंबई, मूळ रा. हैद्रबाद) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबरोबरच चोरी केलेला माल विक्री करणाऱ्या शरीफ मोहम्मद ख्वाजा मैनुद्दीन शेख, बिलाल उर्फ अशोक गोविंद प्रधान, अब्दुल सत्तार मोहम्मद नजीर अहमद सत्तार, मोघल अन्वर अली करीम बेग, प्रभु कल्लापा नजवंडे (सर्व रा. हैद्रबाद) यांना ही अटक करण्यात आली आहे.

सलीम हा मुळचा हैद्राबाद येथील रहिवासी आहे. तो विमानाने किंवा त्याच्या महागड्या कारने पुण्यात येत असे. त्यानंतर ईश्वर शिंदवळ यास जोडीला घेऊन शहरातील उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकांमध्ये चोरी करीत असे. त्यानंतर हैद्राबाद येथे जाऊन तेथील साथीदारांमार्फत सोने-चांदी, अन्य दागिने व वस्तु विक्री करीत असे.

कुरेशीने एकूण 127 गुन्हे केले आहेत. त्यापैकी पुण्यात 82 चोरीचे गुन्हे केले, उर्वरित 47 गुन्हे मुंबई, दिल्ली व हैद्राबाद येथे केले आहे. त्याच्याकडुन 830 ग्राम सोने, 6 किलो 275 ग्राम चांदीसह रोख रक्कम असा 37 लाख 73 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या