चतुःशृंगी पोलीस झालेत सुस्त, एकाच महिन्यात 17 दुकाने फोडली बाणेरमध्ये पुन्हा चार किराणा दुकाने फोडली

पुणे शहरातील चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरटे पोलिसांवर शिरजोर झाले आहेत. परिहार चौक, औंध, बाणेर परिसरात मागील महिन्याभरापासून चोरट्यांनी दुकाने फोडण्याचे सत्र कायम ठेवत धुमाकूळ माजविला आहे. त्यानंतरही पोलिसांच्या डोळ्यावरील झापड उघडलेली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. चोरट्यांनी बाणेर परिसरातील चार दुकाने फोडून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. महिन्याभरात चतुःशृंगी हद्दीत 17 दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी अनिल आगरवाल (वय 51, रा. बाणेर ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी बाणेरमध्ये घडली.

आगरवाल यांचे पाषाण परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर त्यांनी दुकान बंद केले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील 15 हजारांची रोकड चोरुन नेली. त्याशिवाय चोरट्यांनी उत्तम सुपर मार्केट, हरिओम सुपर मार्केट आणि बालाजी सुपर मार्केट दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. दुकाने फोडून चोरीच्या घटनांमुळे चतुःशृंगी परिसरातील किरकोळ व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपुर्वी चोरट्यांनी परिहार चौकातील एकाच इमारतीतील 9 दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले होते. त्यानंतर आठवड्याभरानंतर चोरट्यांनी पुन्हा औंधमधील तीन दुकाने फोडली. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून बाणेर परिसरातील चार दुकाने फोडली आहे. त्यामुळे पोलिसांना चोरटे का सापडत नाहीत, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक ठरले बळीचा बकरा, तडकाफडकी केली उचलबांगडी

चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिन्याभरात वारंवार दुकाने फोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी बाणेर पोलीस चौकीचे इन्चार्ज असलेले सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मात्र, महिन्याभरात तब्बल 17 दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्यानंतरही संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही पोलीस निरीक्षकांवर नेमका कोणता वरिष्ठ अधिकारी मेहेरबान आहे, अशी चर्चा दलात सुरु आहे.

तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह, गुन्हे निरीक्षकांवर होणार कारवाई

चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने दुकाने फोडीच्या घटना होत आहे. त्यापार्श्वभूमीवर अहवाल मागवून संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्यावर कारवाई करुन त्यांची बदली करण्यात येईल.
-पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, झोन चार

आपली प्रतिक्रिया द्या