देशात न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने गुन्हेगारी वाढतेय, ‘निर्भया’च्या आईचा आक्रोश

60
nirbhaya mother

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात न्याय मिळण्यास उशीर होत असल्यामुळे देशात अन्याय वाढतोय, गुन्हेगारी वाढत आहे, असे परखड मत ‘निर्भया’ची आई आशादेवी यांनी व्यक्त केले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात देशभरात संतापाची लाट आणि अशा दुष्कृत्यांविरोधात पेटून उठण्याची प्रेरणा निर्माण करणाऱया दिल्ली ‘निर्भया’ प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पण शिक्षेच्या अंमलबजावणीला होत असलेल्या विलंबामुळे आशादेवी संतापल्या आहेत.

‘निर्भया’वर 2012 मध्ये दिल्लीत सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिला जबरदस्त मारहाण करण्यात आली. ‘निर्भया’ला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. आता ‘निर्भया’च्या आईने न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने अन्याय वाढत चालल्याचे संतप्त मत व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला देशात मुलींवर होणाऱया अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. कोवळय़ा मुलींवर अत्याचार केले जात आहेत. मात्र या प्रकरणांमध्येही गुन्हेगारांना, नराधमांना जलदगतीने शिक्षा दिली जात नाही. पीडित मुलींना न्यायासाठी वाट बघावी लागते आहे हे दुर्दैवी आहे, अशी खंत ‘निर्भया’च्या आईने व्यक्त केली.

दिल्लीच्या महिला आयोगाने मुलींवर होणाऱया वाढत्या अत्याचारांबाबत आवाज उठवला आहे. एवढेच नाही तर ‘निर्भया’ प्रकरणात आरोपींना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासनाला नोटीसही बजावली आहे. त्यानंतर ‘निर्भया’च्या आईची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. महिला आयोगाने मला खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला, असेही ‘निर्भया’च्या आईने म्हटले आहे.

‘दिल्लीच्या ‘निर्भया’ प्रकरणात विलंबाने का होईना पण आरोपींना शिक्षा झाली, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास आणखी किती विलंब लागणार आहे ते आपल्यालाही ठाऊक नाही’.
– आशादेवी, ‘निर्भया’ची आई

आपली प्रतिक्रिया द्या