प्रेमासाठी काय पण; शिक्षकाचा झाला तस्कर 

दिल्लीत एक आगळंवेगळं प्रकरण समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी एका शिक्षकाला शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपी शिक्षक पैशाच्या लालसेपोटी तस्कर झाल्याचे बोललेले जात आहे. गुलफाम असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने प्रेयसीचे खर्च भागवण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने शस्त्रास्त्रांची तस्करी सुरू केल्याची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलफाम याने राज्यशास्त्र या विषयात ‘एमए’ची पदवी मिळवली आहे. तो उत्तर प्रदेशमधील बदायूं शहरातील एक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. गुलफाम याची एक प्रेयसीही आहे. जिचा खर्च शिक्षकाच्या पगारातून त्याला उचलणे जमत नव्हते. याच दरम्यान गुलफामची ओळख कुंदन नावाच्या एका व्यक्तीशी झाली. कुंदनने त्याला झटपट पैसे कमवण्यासाठी शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी करण्याचा मार्ग सांगितला. ज्यानंतर गुलफाम दिल्लीत आला आणि त्याने ‘नंदू गँग’ची भेट घेऊन त्यांना 10 शस्त्र पुरवण्याची ऑर्डर घेतली. यानंतर तो पुन्हा आपल्या शहरात परतला.

बदायूंहून दिल्लीत शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. गुलफाम जेव्हा पुन्हा बदायूंहून दिल्लीत आला तेव्हा पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. पोलिसांना आरोपीकडून एक बॅग ताब्यात घेतली होती. ज्यामध्ये त्यांना 10 भेटवस्तू दिसल्या. या भेटवस्तू उघडल्या असता त्यांना त्यात 8 देशी पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी ही हत्यारे जप्त केली असून या तस्करीशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या