‘साहेब, मी विद्यार्थी आहे, चोर नाही, अटक करू नका’

1852

‘साहेब, मी चोर नाही, मी चोरी केली नाही. मी विद्यार्थी आहे, माझ्यावर अन्याय करू नका. माझी एकच चूक झाली की, मी शेजाऱ्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडून मोबाइल विकत घेतला. त्यालाही मी तुमच्या ताब्यात दिले आहे. मला सोडून द्या अन्यथा माझं करिअर खराब होईल.’

अशा शब्दात पॅरामेडिकल अभ्यास क्रमातील विद्यार्थी पोलिसांना विनंती करत होता, मात्र पोलिसांनी त्याला एका मोबाईल चोरासोबत अटक करत तुरुंगात टाकले आहे. एका प्रवाशाने फिरोजाबाद मधील टुंडला जीआरपी पोलिस ठाण्यात मोबाइल व पर्स चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती.

यानंतर पोलिसांनी कारवाई करत टुंडला रेल्वे स्थानकाच्या लगत राहत असलेल्या पॅरामेडिकल अभ्यास क्रमातील विद्यार्थी मोहम्मद अन्वर याला अटक केली. अन्वर त्याच्याच शेजारी राहत असलेल्या इमरान यांच्याकडून एक चोरीचा मोबाईल विकत घेऊन, त्यात सिम टाकून वापरत होता. मात्र मोबाईल चोरीचा आहे हे त्याला माहीत नव्हते.

पोलीस याप्रकरणी चोराचा शोध घेत असताना, अन्वरने मोबाईल सुरू केला. मोबाईलचा नेटवर्क ट्रेस करून पोलीस अन्वरच्या घरी पोहोचले, मात्र तो घरी मिळाला नाही. नंतर अन्वरचे वडील त्याला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी अन्वरची विचारपूस केल्यावर त्यांना इमरान बद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी अन्वरने दिलेल्या माहितीच्या आधारे इमरानचा शोध घेत त्याला अटक केली.

यानंतर चोरीचा मोबाईल विकत घेतला या गुन्ह्याखाली पोलिसानी अन्वरला अटक केली. घाबरलेला अन्वर यावेळी पोलिसांचे हातपाय पकडून माफी मागू लागला. मात्र पोलिसांनी त्याचे काहीही न ऐकता त्यावर गुन्हा नोंदवून त्याला इमारनसोबत तरुंगात टाकले.

जीआरपी स्टेशन प्रभारी विजय कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्याकडून प्रवाशांकडील चोरीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्यासह चोरीची वस्तू खरेदी करणारी व्यक्तीही तितकीच दोषी असते. जप्त केलेल्या मोबाइलच्या आधारे, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या