‘स्वप्नपूर्ती शुगर’ला डिस्टिलरी परस्पर चालविण्यास दिली- सांगली जिल्हा बँक वसंतदादा कारखान्यावर फौजदारी दाखल करणार

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेऊन दत्त इंडिया कंपनीला चालवायला देण्यात आला. त्यानंतर कारखान्याची डिस्टिलरीही ताब्यात घेण्यात आली होती; परंतु कारखाना व्यवस्थापनाने परस्पर ‘स्वप्नपूर्ती शुगर’ला डिस्टिलरी चालविण्यास दिली. डिस्टिलरीवर बँकेचा ताबा असताना फसवणूक केल्याप्रकरणी कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन वसंतदादा कारखान्यावर फौजदारी दाखल करण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने बडय़ा सहकारी संस्थांची कर्जे थकीत राहिल्याने त्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करीत ताब्यात घेतल्या आहेत. सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या थकीत कर्जापोटी तो ताब्यात घेतला आहे. बँकेने निविदा प्रक्रिया काढून कारखाना मुंबईच्या दत्त इंडिया कंपनीला भाडेतत्त्वावर चालवायला दिला आहे. त्यानंतर कारखान्याची डिस्टिलरी प्रकल्पही बँकेने ताब्यात घेतला होता. डिस्टिलरी चालवायला देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, त्याला अपेक्षित किंमत न मिळाल्याने चालवायला देण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांपासून डिस्टिलरीचा ताबा बँकेकडेच आहे.

वसंतदादा कारखान्याच्या डिस्टिलरीतील दूषित पाण्यामुळे कृष्णा नदीतील मासे मृत झाले. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावून डिस्टिलरी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आमनार जयंत पाटील यांनी जिल्हा बॅँकेच्या ताब्यातील वसंतदादा कारखान्याची डिस्टिलरी स्वप्नपूर्ती शुगर्स अनधिकृतपणे चालवत असल्याचा आरोप केला. वसंतदादा कारखान्यांची डिस्टिलरी बँकेचे सिम्बॉलिक पझेशन आहे. फिजिकल नाही, त्यामुळे कोणी अनधिकृतपणे ही डिस्टिलरी चालवू शकत नाही. त्याठिकाणी डिस्टिलरी प्रकल्पाच्या गेटबाहेर बँकेने सुरक्षारक्षक उभा केला होता. डिस्टिलरी चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

बॅँकेच्या रेकॉर्डवर डिस्टिलरी बंदच आहे. त्यामुळे ती कोणालाही चालविण्यास देण्याचा प्रश्नच नाही. ‘स्वप्नपूर्ती शुगर्स’चा या डिस्टिलरीची काहीही संबंध नाही. मात्र, वसंतदादा कारखाना व्यवस्थापनाने परस्पर ‘स्वप्नपूर्ती शुगर’ला डिस्टिलरी चालविण्यास दिली. डिस्टिलरीवर बँकेचा ताबा असताना फसवणूक केल्याप्रकरणी कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन वसंतदादा कारखान्यावर फौजदारी दाखल करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले.

वसंतदादा कारखान्याची डिस्टिलरी असताना ‘स्वप्नपूर्ती शुगर्स’च्या नावावर डिस्टिलरीचा परवाना घेण्यात आला आहे. ही बाब गंभीर असून, स्वप्नपूर्ती शुगरचा परवाना रद्द करून वसंतदादा कारखान्याच्या नावावर परवाना देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा बँकेकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.